श्रीनगर । सोनमर्गजवळ लष्कराच्या छावणीवर हिमकडा कोसळला तर गुरेझ विभागात हिमस्खलनामुळे भारतीय लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन दुर्घटनांमध्ये एका मेजरसह 15 जवानांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू असताना काही जवानांची सुटकादेखील करण्यात आली. गुरेझ विभागातील हिमस्खलनात महाराष्ट्रातील तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. माना, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला येथील शिपाई संजू सुरेश खंदारे (वय 26), अकोल्याचे आनंद गवई (वय 26) व गंजपूर, ता. धारूर, जि. बीड येथील विकास समुंद्रे (वय 26) अशी महाराष्ट्रातील या जवानांची नावे आहेत. त्यांचे पार्थिव लवकर त्यांच्या गावी आणण्यात येणार आहे. हिमस्खलनात सहा नागरिकांचाही मृत्यू झाला. बचावपथकांनी एकूण 21 मृतदेह बाहेर काढले आहेत. शुक्रवारी आणखी चौघांचे मृतदेह हाती आले आहेत. हवामान ठीकठाक झाल्यानंतर शहीद जवान व अधिकारी यांचे मृतदेह श्रीनगर येथे आणले जाईल, अशी माहिती लष्कराच्यावतीने देण्यात आली.
बर्फात सापडले मृतदेह
पाक सीमारेषेजवळ सोनमर्गमध्ये भारतीय लष्कराची छावणी आहे. या छावणीवर बुधवारी दुपारी हिमकडा कोसळला होता. या घटनेत काही जवान बर्फाच्या ढिगार्याखाली अडकले होते. यातील सहाजणांची सुटका करण्यात यश आले होते, तर एका जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. गुरेझ विभागातही हिमवादळ आणि भूस्खलन झाल्याने चौघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बचावकार्य सुरू असताना बचावपथकांना आणखी मृतदेह सापडल्याने मृत जवानांची एकूण संख्या 15 झाली आहे. काही जवानांना सुखरूप वाचविण्यातही बचावपथकांना यश आले. गुरेझ विभागात मागील पंधरा दिवसांपासून जोरदार हिमस्खलन होत आहे. यामुळे संपुर्ण गुरेझ विभागाला हिमस्खलनाचा फटका बसला आहे.
महाराष्ट्राने तीन वीरपुत्र गमावले
सोनमर्ग आणि गरेझ येथे झालेल्या हिमस्खलनात महाराष्ट्रातील तीन जवानांना वीरमरण आले आहे. माना, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला येथील शिपाई संजू सुरेश खंदारे (वय 26), अकोल्याचे आनंद गवई (वय 26) व गंजपूर, ता. धारूर, जि. बीड येथील विकास समुंद्रे (वय 26) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे पार्थिव लवकर त्यांच्या गावी आणण्यात येणार असल्याचे लष्करातील सूत्रांनी सांगितले.