5 बँकांना 17 हजार 500 कोटींचा फटका!

0

नीरव मोदीच्या 29 मालमत्तांवर जप्ती

नवी दिल्ली/मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील महाघोटाळ्यामुळे इतर किमान 5 बँकांना 17,500 कोटी रुपयांचा फटका बसू शकेल, असा प्राप्तिकर विभागाचा अंदाज आहे. पीएनबीवर विसंबून या बँकांनीही नीरव मोदी व मेहुल चौकसी या ठगांच्या कंपन्यांना कर्जे व बँक गॅरेन्टी दिल्या आहेत. प्राप्तिकर विभागाचा हा प्राथमिक अंदाज असून, अन्य बँकांना प्रत्यक्ष लागणारी झळ याहूनही कदाचित जास्त असण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या महाघोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी व त्याच्या समूहाच्या 29 मालमत्तांवर जप्ती आणण्यात आली असून, त्यांची 105 बँक खाती गोठविण्यात आली आहेत.

अ‍ॅक्सिस, अलाहाबाद व अन्य बँकांचा समावेश
बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानल्या जात असलेला हा पंजाब नॅशनल बँक घोटाळा आहे. एक हजार 771 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 11 हजार 400 कोटींचा हा घोटाळा आहे. लेटर ऑफ अंडरटेकिंगचा गैरवापर करुन हा घोटाळा केल्याची प्राथमिक माहिती आहे. पीएनबी ही देशातील दुसर्‍या क्रमांकाची पब्लिक सेक्टर बँक आहे. अ‍ॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेच्या परदेशी शाखांचीही या घोटाळ्यात फसगत झाल्याचे उघड झाले आहे. डायमंड किंग नीरव मोदी आणि गीतांजली जेम्स या दोन ग्रुप्सच्या नावाने पंजाब नॅशनल बँकेने लेटर ऑफ अंडरटेकिंग दिल्याचा आरोप आहे. गीतांजली जेम्स, जिली इंडिया आणि नक्षत्र, तसेच नीरव मोदी ग्रुप फर्म्सच्यावतीने एलओयू किंवा एफएलसीच्या आधारे अ‍ॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेकडून कर्ज देण्यात आले आहे. हाँगकाँग, दुबई, न्यू यॉर्कमध्ये नीरव मोदीची परदेशी केंद्रं आहेत. एलओयू दाखवून 2010 पासून नीरव मोदी क्रेडिटवर खरेदी करत असल्याचा संशय आहे.

लाच घेतल्याची माजी व्यवस्थापकाची कबुली
लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्याच्या मोबदल्यात मोठी लाच मिळत होती, अशी कबुली पीएनबी बँकेचा माजी व्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टीने दिली आहे. याप्रकरणी शेट्टीसह मनोज खरात आणि हेमंत भट या तिघांना सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर सीबीआयच्या चौकशीत गोकुळनाथ शेट्टीने ही कबुली दिली. गोकुळनाथ शेट्टी यांच्या कार्यकाळातच नीरव मोदी यांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आली होती. विशेष म्हणजे, या आरोपींमध्ये मनोज खरात हा एक मराठी चेहरा असून, तो अहमदनगरच्या कर्जतचा रहिवासी आहे. मनोज खरात बँकेत सिंगल विंडो ऑपरेटर पदावर कार्यरत होता. सीबीआय न्यायालयाने 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

मोदींनी 2 मिनिटे तरी बोलावे : राहुल गांधी
पीएनबी घोटाळ्याची रक्कम 22 हजार कोटी असल्याचे सांगत राहुल गांधींनी एक ट्विट केले आहे. राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधान मोदींनी मुलांना 2 तासात परीक्षा कशी उत्तीर्ण करायची हे सांगितले. पण 22 हजार कोटींच्या बँकिंग घोटाळ्यावर ते 2 मिनिटेही बोलले नाहीत. जेटली महोदयही लपून बसले आहेत. दोषींसारखी वर्तणूक बंद करा आणि बोला. कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारीही मोदी सरकारवर हल्लाबोल करताना पीएनबी घोटाळ्याची सुरूवात पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर झाल्याचा आरोप केला होता. 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या आणि देशातील सगळा पैसा बँकांमध्ये टाकला तेव्हाच झाली, असा दावा राहूल गांधींनी केला आहे.