5 हजार 192 कोटींच्या कोटींच्या जागतिक निविदा

0

एचसीएमटीआर रस्ता मार्गी

पुणे : शहराच्या हद्दीतील प्रस्तावित उच्च क्षमता वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) महापालिकेकडून 5 हजार 192 कोटींच्या जागतिक निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तब्बल तीस वर्षांहून अधिक काळ कागदावर असलेला एचसीएमटीआर रस्ता आता भूमिपूजनाच्या मार्गावर आहे. महापालिकेच्या 1987 च्या विकास आराखड्यात शहराच्या हद्दीतून एचसीएमटीआर रस्ता आरक्षित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा रस्ता प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला आहे. जूनपूर्वीच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रक्रिया पूर्ण करून या रस्त्याच्या कामाची निविदा गुरुवारी प्रसिध्द केली आहे.

निविदा भरण्याची मुदत 23 एप्रिलपर्यंत

बांधा, वापरा, हस्तांतरित करा (डीबीएफओटी) अथवा ‘हायब्रिड अ‍ॅन्युटी’ अशा दोन स्वरूपात या रस्त्यासाठीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. येत्या 23 एप्रिलपर्यंत निविदा भरण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. या रस्त्याचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यांत संपूर्ण उन्नत स्वरूपातील मार्गाचे काम केले जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात या उन्नत मार्गावर ये-जा करण्यासाठीच्या रॅम्पबरोबरच विविध सेवा वाहिन्यांचे स्थलांतरच्या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत.

भूसंपादनाची प्रक्रिया गतीने

एकूण 36.6 किलोमीटर लांबीचा व 24 मीटर रुंदीचा हा संपूर्ण रस्ता इलेव्हेटेड असणार आहे. त्यावर 6 मार्गिका असणार आहेत. त्यापैकी 2 बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. विशेषत: राष्ट्रीय महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार आहे. इलेव्हेटेड असणार्‍या या मार्गावर बीआरटीसाठी 28 स्थानके असणार असून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायर्‍या आणि यांत्रिक जिने (एलेव्हेटर्स) यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रस्त्यासाठीची 50 टक्क्यांहून अधिक जागा पालिकेकडे असून, उर्वरित जागेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया गतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.