5 जवान शहीद, उरीनंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला!

0

सुंजवान हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मूतील सुंजवान येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन अधिकार्‍यांसह पाच जवान शहीद झाले असून, दुसर्‍या दिवशीही जोरदार चकमक सुरु होती. दुपारनंतर आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर कालपासून या हल्ल्यातील चौघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे. दुपारनंतर गोळीबार थांबला असला तरी, सुरक्षा जवानांनी जोरदार सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. अद्यापही दोन दहशतवादी लपून बसले असावेत, अशी शंका व्यक्त केली जात होती. 2016 मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला असून, केंद्र सरकारने जशाच तसे उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी या दहशतवाद्यांनी या लष्करी तळात प्रवेश करत हल्ला चढविला होता. यावेळी झालेल्या जोरदार गोळीबारात ज्युनिअर कमिशंड अधिकार्‍यासह दोन जवान शहीद झाले होते.

लष्करी कुटुंबीयांची सुरक्षा धोक्यात
सुंजवान दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराच्या जवानाने संपूर्ण परिसर सील केला होता. तसेच, रात्रभर जोरदार सर्च ऑपरेशन राबविले होते. जैश-ए-मोहम्मदच्या या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणास शस्त्रसामग्री असल्याने दहशतवाद्यांनी लष्कराला दीर्घकाळ झुंज दिली. दोन्ही बाजूने उडालेल्या धूमश्चक्रीत एक मेजर, तीन कर्मचारी आणि पाच महिला व काही बालके गंभीर जखमी झाले आहेत. लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेप्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी मीडियाशी बोलताना सांगितले, की सर्च ऑपरेशन सुरुच असून, निवासी ठिकाणाहून लष्करी कुटुंबीयांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तरीही काही कुटुंब अद्याप तिथे असल्याने मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले लष्करी जवान सावधानतेने कारवाई करत आहेत. कुटुंबीयांच्या सुरक्षेला लष्कराने प्राधान्य दिल्याने लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईची गती कमी झालेली आहे. दुपारनंतर गोळीबार थांबला आहे. तसेच, घटनास्थळावरून दोन दहशतवाद्यांचे मृतदेह हाती आले आहेत. अद्याप आणखी एक दहशतवादी लपून बसला असण्याची शक्यताही ले. कर्नल आनंद यांनी व्यक्त केली.

जम्मूमध्ये हायअ‍ॅलर्ट जारी
जम्मूक्षेत्रात 15 महिन्यांपूर्वी अशाप्रकारचा दहशतवादी हल्ला झाला होता. 29 नोव्हेंबर 2016 रोजी जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी नगरोटा लष्करी तळात घुसले होते. त्यावेळी झालेल्या चकमकीत दोन अधिकार्‍यांसह सात जवानांना हौतात्म्य पत्कारावे लागले होते. या हल्ल्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. शनिवारीदेखील दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन मागील बाजूने लष्करी तळात घुसले. या तळात लष्करी जवानांची कुटुंबे राहण्यास असल्याने दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईला अडथळा आला होता. संपूर्ण तळाला सील करण्यात आल्यानंतर रात्रभर सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. या हल्ल्यानंतर जम्मूमध्ये हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला असून, शहर व आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनीही वरिष्ठ अधिकार्‍यांकडून घटनेची माहिती घेऊन जशाच तसे उत्तर देण्याच्या सूचना केल्या होत्या.

लष्करी प्रवक्त्यांची माहिती :
* सुंजवान दहशतवादी हल्ल्यात एकूण 6 बळी
* पाच जवान, आणि एका नागरिकाचा चकमकीदरम्यान मृत्यू
* दहशतवाद्यांकडून एके-56 रायफल्स, ग्रेनेड, स्फोटके हस्तगत
* राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)चे पथक घटनास्थळी दाखल
* या हल्ल्यात एकूण 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.