5 जूनला महाराष्ट्र बंद

0

अहमदनगर। मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. 5 जून रोजी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद राहिल. 6 जूनला सर्व सरकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार आणि 7 तारखेला आमदार-खासदारांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.पुणतांबा येथे किसान कोअर कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शेतकरी जाणार असल्याची माहितीही पदाधिकार्‍यांनी दिली. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

40 शेतकरी ताब्यात
दरम्यान नाशिकमध्ये शुक्रवारी पोलिसांनी 40 शेतकर्‍यांना ताब्यात घेतले . येवल्यातील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर वाहनांचे नुकसान करणार्‍या सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. येवला- कोपरगाव रस्त्यावरील पिंपळगाव जलाल येथील टोलनाक्यावर संपाच्या पहिल्या दिवशी आंदोलकांनी वाहने अडवून तोडफोड केली होती. आंदोलक प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांच्याकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली होती. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला होता.

मंत्र्यांना ताकीद : हा संप मिटवण्यासाठी पणन मंत्र्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र करत असलेल्या प्रयत्नाविषयी फक्त राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बोलण्याचे फर्मान मुख्यमंत्र्यांनी काढले असून भाजपच्या मंत्र्यांनी यासंदर्भात कोणतीही माहिती माध्यमांना द्यायची नाही अशी सक्त ताकीद दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या संपाला एकखांबी नेतृत्व नसल्याने शेतकरी स्वयंस्फूर्तीने उतरल्याने संप मिटवण्यासाठी कोणाशी चर्चा करायची असा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना पडला आहे. फुंडकर आणि देशमुख यांच्याकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना अद्याप शेतकर्‍यांनी कोणताच प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. तोडग्याला अंतिम मंजूरी देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवल्याने शेतकर्‍यांना आश्‍वासित करताना अडचणी येत आहेत.संपासंदर्भातमाध्यमांशी बोलण्याचे अधिकार फक्त सदाभाऊ खोत यांना असल्याने या दोन मंत्र्यांच्या प्रयत्नांची माहिती जनतेला पोहचत नाही हा संप आणखी काही दिवस असाच सुरू राहिला तर त्याची किंमत राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात चुकवावी लागेल, अशी भीतीही या वरिष्ठ मंत्र्याने व्यक्त केली आहे.

अण्णांचा पाठिंबा
शेतकर्‍यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मागण्या आणि आंदोलन रास्त आहे. मात्र, त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे, असे सांगतानाच, शेतकर्‍यांचं शिष्टमंडळ सोबत आल्यास मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची तयारी आहे, असे अण्णांनी म्हटले आहे. संपाच्या दुसर्‍या दिवशी हजारे यांनी भूमिका मांडली आहे. सहन करण्याची क्षमता संपल्याने शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरला आहे. शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकर्‍याची कशी वाताहत होते हे मी लहानपणापासून माझ्या घरातच अनुभवले आहे. शेतकर्‍यांच्या वेदनांची मला जाणीव आहे, असे ते म्हणाले. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर माझी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झालेली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

फूट पाडण्याचे कारस्थान-शरद पवार
मुंबई । अल्पकर्जधारक शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देऊन राज्य सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून शेतकर्‍यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केले.शेतकर्‍यांनी संपावर जाणे ही इतिहासातली अभूतपूर्व व सरकारच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट आहे. या परिस्थितीला फक्त सध्याचे सरकार कारणीभूत आहे. उत्तर प्रदेशमध्ये आदित्यनाथ सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. पण, महाराष्ट्रात सरकारने शेतकर्‍यांना तो न्याय दिला नाही. शेतकर्‍यांना संपवण्याचे सरकारचे धोरण आहे, असा आरोप त्यांनी केला.