पुण्यातील गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे विविध मागण्या सादर
पुणे : गणेशोत्सव काळात ठराविक उंचीनंतर शहरात बॉक्स कमानींना परवानगी देण्यात यावी, त्याचबरोबर उत्सवादरम्यान पाच दिवस ध्वनीक्षेपक सुरू ठेवण्याला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यातील गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस मुख्य शहरांचे महापौर, राज्य शासनाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत
यावेळी महापौर टिळक यांनी पुण्यातील गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या. गणेशोत्सवादरम्यान, कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ठराविक उंचीनंतर मंडळांना बॉक्स कमानींसाठी परवानगी देण्यात यावी, या प्रमुख मागण्या टिळक यांनी केल्या. पुणे पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव गणेश मंडळांना बॉक्स कमानीसाठी परवानगी देण्यास मनाई केली होती. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यातच, गर्दीपुढे साध्या कमानी टिकणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
बॉक्स कमानींना परवानगी नाही
यंदा बॉक्स कमानींना परवानगी दिली जाणार नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या मंडप धोरणानुसार ठरावीक कमानी घालण्यास मंजुरी असताना, पोलिसांकडून त्यावर निर्बंध घालण्याचे कारण काय, अशी विचारणा करण्यात आली. तसेच, यापूर्वी दरवर्षी जमिनीपासून ठरावीक अंतर सोडून बॉक्स कमानींना परवानगी दिली जाते; मग यंदाच त्यावर बंधने कशासाठी, अशी विचारणा मंडळांच्या प्रतिनिधींनी केली. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बॉक्स कमानींना परवानगी देता येणार नाही, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतली. त्याऐवजी, मंडळांनी साध्या कमानी उभाराव्या, असे सुचविण्यात आले.
मंडळांचे शुल्क सरकार देणार
बॉक्स कमानींवरून मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलिस प्रशासनामध्ये वाद होत असल्याचे लक्षात येताच, बापट यांनी त्यामध्ये मध्यस्थी करत कमानी व रनिंग मंडपासाठी मंडळांना पालिकेकडे ठरावीक शुल्क जमा करावे लागते. हे शुल्क मंडळांकडून घेण्यात येऊ नये, ते सरकारकडून महापालिकेला दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
मोठ्या आवाजातील डीजे सहन करणार नाही : बापट
दरम्यान गणेशोत्सवात होणार्या ध्वनीप्रदूषणाचा लहान मुले, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान मद्यपान आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवणे सरकार सहन करणार नाही, असा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी गणेशमंडळांना दिला आहे.पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी गणेश मंडळांना गणेशोत्सवादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास दिला. तर सौरभ राव म्हणाले, महापालिकेकडून गणेश मंडळांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. गणेश मंडळांनी परवानगीसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करावेत. मागील तीन दिवसांपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली.