पीएमपी अजब कारभार; 102 आयुर्मान संपलेल्या बसेस स्क्रॅप, ब्रेकडाउनची संख्या वाढली
पुणे : पीएमपी ताफ्यात दरवर्षी स्क्रॅप होत जाणार्या बसेसच्या तुलनेत नव्याने दाखल होणार्या बसेसचे प्रमाण अत्यल्प आहे. 2013 ते 2017 या पाच वर्षांत केवळ 12 नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यातुलनेत 2018 या एकाच वर्षी तब्बल 102 आयुर्मान संपलेल्या बसेस स्क्रॅप करण्यात आल्या. यामुळे पीएमपी ताफ्यातील जुन्या बसेसचा भरणा मोठ्या प्रमाणात वाढला असून याच बसेस ब्रेकडाउनचे प्रमाण मोठे आहे. यापूर्वी पीएमपी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राहिलेल्या अधिकार्यांनी नव्या बसखरेदी न केल्याने ही परिस्थिती प्रशासनावर ओढावली असल्याचे दिसून येते.
प्रशासनाकडून बसखरेदीकडे दुर्लक्ष
रस्त्यावरील पीएमपी बस ब्रेकडाउनची वाढती संख्या, खिळखिळ्या आणि धूर सोडत जाणार्या बसेसबाबत प्रवाशांकडून येणार्या तक्रारींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. याबाबत पीएमपी प्रशासनावर सातत्याने टीका केली जाते. याला पीएमपी ताफ्यातील जुन्या बसेसची वाढती संख्या कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. ज्या प्रमाणात जुन्या बसेस स्क्रॅप केल्या जातात त्या तुलनेत नव्या बसेस उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पीएमपी प्रशासनाकडून बसखरेदीकडे दुर्लक्ष झाल्याने आज खिळखिळ्या बसेसची समस्या ओढावली आहे. परिणामी नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मुंडे च्या कार्यकाळात सर्वाधिक बसेस
सध्या अध्यक्षपदी असलेल्या नयना गुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यांत 200 मीडीबसेस नव्याने दाखल झाल्या. तर, पाचशे इलेक्ट्रिक बसेस खरेदीलाही गुंडे यांच्या कार्यकाळातच मंजुरी देण्यात आली. यातील 25 बसेस येत्या चार दिवसांत दाखल होणार असून उर्वरीत पुढील सहा महिन्यांत टप्पाटप्याने दाखल होणार आहेत. या व्यतिरीक्त 400 सीएनजी बसेस खरेदीला मान्यता देण्यात आली असून येत्या सहा महिन्यांत टप्प्याटप्याने त्या दाखल होणार आहेत. यामुळे सुमारे गेल्या 10 वर्षांचा बॅकलॉग गुंडे यांच्या कार्यकाळात भरुण निघणार असल्याचे चित्र आहे.
165 बसेस अगदीच जुन्या
पीएमपी ताफ्यात जुन्या बसेसचा भरणा वाढला असून सद्यस्थितीत 12 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असलेल्या तब्बल 165 बसेस आहेत. तर, 11 ते 12 वर्षांच्या 190 बसेस आहेत. रस्त्यांची दुरवस्था, मोठे खड्डे यासारख्या कारणांमुळेही काही प्रमाणात बसेसची दुरवस्था वाढत असल्याचे दिसून येते आहे. जुन्या बसेसची संख्या मोठी असताना गतवर्षी पीएमपी ताफ्यात नव्या 200 मीडी बसेस दाखल झाल्या. यामुळे पीएमपी प्रशासनाला काहीसा आधार मिळाल्याचे दिसून येते. पीएमपी अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांच्या नियुक्तीनंतर या बसेस पीएमपी ताफ्यात आल्या आहेत.
बस खरेदीसाठी पीएमपी प्रशासनाला पुणे, पिंपरीचिंचवड महापालिकेकडून आर्थिक मदत केली जाते. नागरिकांना सुरळीत आणि सुरक्षित सेवेच्या गप्पा मारणार्या प्रशासनाकडून बसखरेदीकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी सर्वसामान्य पुणेकरांना रोजच नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.