मुंबई । मुंबई महानगरपालिकेने शहरातील वाढत्या कचर्याच्या समस्येवर उपाय म्हणून शहर आणि उपनगरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्याकडे निर्माण होणार्या कचर्याची विल्हेवाट त्यांनीच खतनिर्मितीचा प्रकल्प उभारून करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पश्चिम उपनगरातील 5 सोसायट्यांनी एनजीओच्या सहकार्याने कचर्यावर पुन:प्रक्रिया सुरू केली असून, तब्बल 37 हजार किलो कचर्यावर पुनर्प्रकिया केली आहे. मुंबईत डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न भेडसावत असल्याने पालिकेने सोसायट्यांना ओला आणि सुका कचर्याच्या वर्गीकरणाची सूचना केली होती. पालिकेच्या आदेशाचे पालन करत उपनगरातील काही सोसायट्यांनी पुढाकार घेतला आहे.
सुका-ओला कचर्याचे केले विभाजन
अंधेरी पश्चिम येथील रहेजा क्लासिक, बोरिवलीतील ग्रीर रिजेड, खार येथील देव छाया, जोगेश्वरीतील क्मे एलिट आणि जोगेश्वरीतील कल्पतरू इमारत क्र. 5 यांनी कचर्याचे वर्गीकरण केले आहे. ओला, सुका अशा गटात या सोसायट्यांनी कचर्याची विभागणी केली. या सोसायट्यांनी कचर्याचे वर्गीकरण आणि पुनर्प्रक्रिया करून तब्बल 37 हजार किलोपेक्षा कमी कचरा गेल्या वर्षभरात एक प्रकारे वाचवला आहे. ओला कचर्यावर पुनर्प्रक्रिया केल्यानंतर उपलब्ध असलेला कचरा सोसायट्यांमधील
गार्डनमध्ये खत म्हणून वापरण्यात येतो.
सोसायट्यांनी घेतला पुढाकार
कचर्याचे वर्गीकरण आपण सहज करू शकतो. मात्र, वर्गीकरणानंतर कचर्याचे करायचे काय? हा मोठा सवाल आहे. कारण ओल्या कचर्यामधील भाजी व फळांची साले काही दिवसांनंतर कुजतात आणि त्यातून दुर्गंधी येते. त्यामुळे ओल्या कचर्यावर 24 तासांत पुनर्प्रक्रिया करणे गरजेचे आहे. या कामी आम्हाला काही पर्यावरणपूरक एनजीओंनी मदत केली. या एनजीओंकडून माफक दरात खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीद्वारे ओल्या कचर्यावर पुनर्प्रक्रिया करणे सोपे झाले असल्याची माहिती एका सोसायटीमधील सदस्याने दिली. सरकारी यंत्रणेकडून कचर्याचे वर्गीकरण करावे, हे सांगण्याची गरज नाही. आपण स्वत:हून कचर्याचे वर्गीकरण करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.