जम्मूत ५ जवान शहीद, दहशतवाद्यांचाही खात्मा

नवी दिल्ली वृत्तसंस्था |

भारतीय लष्कराच्या वाहनावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या वाहनावर जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत काही दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात जवानांना यश आले असून भारतीय सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरूच आहेत.

मुसळधार पाऊस आणि दृष्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत २० एप्रिल रोजी अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. याप्रकरणातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याकरता ३ मे पासून अभियान राबवण्यात येत आहे. राजौरी जिल्ह्यातील कांडी भागातील केसरी हिल येथे दहशतवाद्यांचा गट लपला असल्याची माहिती जवानांना

मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी हे सर्च ऑपरेशन राबवले. शनिवारी जम्मूमध्ये मसुळधार पाऊस आहे. या मुसळधार पावसातच लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू होते. राजौरी जिल्ह्यात गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांनीही गोळीबार केला. तसंच, वाहनावर ग्रेनेड हल्ला केला. यामुळे दोन जवान जागीच शहीद झाले तर चारजण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचार मिळावेत म्हणून त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, चार जखमींपैकी तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५ झाला आहे. २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यातही लष्कराने राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्येही पाच जवान शहीद झाले होते. तसंच त्यानंतर पुन्हा राबवण्यात आलेल्या चकमकीतही चार जवान शहीद झाले होते. हे ऑपरेशन महिनाभर राबवण्यात आले होते. परंतु, एकाही दहशतवाद्याला पकडण्यात आले नव्हते.