आंदोलनात निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियाला ५ लाखाची मदत

मुंबई l डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी दादर या ठिकाणी भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित शेतकरी लॉन्ग मार्च मध्ये निधन झालेल्या शेतकऱ्याच्या नातेवाइकांस पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

काही महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघाले होते.. तब्बल सात दिवसांच्या प्रवासानंतर शेतकरी लॉन्ग मार्च शहापूरपर्यंत पोहचला होता. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ आणि लॉन्ग मार्चमधील नेतृत्वाची बैठक झाली होती. याच दरम्यान दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील पुंडलिक दादा जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. जाधव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी मंत्री दादा भुसे यांनी मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचे सांगितले होते.

 

मुख्यमंत्र्यांकडे गांवकऱ्यांनी व्यक्त केली होती नाराजी

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील शेतकरी पुंडलिक जाधव यांचा वाशिंदमध्ये मृत्यू झाला. १७ मार्च रोजी जाधव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मोर्चेकऱ्यांनी त्यांना तातडीने शहापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः या घटनेची माहिती घेतली होती. या मृत्यूनंतर त्यांच्या गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आमच्या मागण्या अगोदरच मान्य केल्या असत्या आणि त्याची अंमलबजावणी केली असती तर ही वेळ आली नसती अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या. आमच्या शेतकरी बांधवाचा मृत्यू झाला, त्याला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी देखील मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत दिली जाईल, अशी माहिती दादा भुसे यांच्यावतीने दिली होती. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये दिले आहेत.