50 एकर जंगल पिंजत जामठीतील एटीएम फोडणार्‍यांना पकडले

0

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : बोदवडमधील मका चोरीचीही आरोपींनी दिली कबुली : अनेक गुन्हे उघडकीस येणार

जळगाव : बोदवड तालुक्यातील जामठी येथील टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न 14 जानेवारीच्या मध्यरात्री झाला होता मात्र सुदैवाने चोरट्यांकडून एटीएम फुटले नसल्याने रोकड सुरक्षित राहिली होती तर चोरट्यांनी मात्र एटीएमसह डीव्हीआरचे नुकसान केले होते. या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने भुरा बाळु गायकवाड (25, रा.भिलाटी, बोदवड) व आनंद गुलाब धुळकर (25, रा.भिलाटी,बोदवड) यांना उजनीच्या जंगलातून अटक केली आहे. दरम्यान, आरोपींनी बोदवडमध्येही मक्याची चोरी केली असून आणखी काही गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांच्या नेतृत्वात एएसआय अशोक महाजन, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकरअंभोरे, दीपक पाटील, अशरफ शेख, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, दादाभाऊ पाटील, दीपक पाटील, अशोक पाटील तसेच हवालदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

चोरट्यांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
अटकेतील गायकवाड व धुळकर यांनी जामठीत एटीएम फोडण्यासह पानटपरी फोडल्याची तसेच बोदवड शहरातील मनुर रोडवरील शांतीलाल पुखराज जैन अ‍ॅग्रो मार्केट यार्डमधून एक लाख 36 हजारांचा मका चोरीची कबुली दिली असून आणखी काही चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यांमध्ये शंकर जंगलु ठाकरे, गोविंदा अर्जुन गायकवाड, आकाश हरचंद गायकवाड, सदाशीव पंढरी पवार, किसन उर्फ शेंडया कैलास सोनवणे, किसन संजय मोरे, प्रवीण सुकलाल घुळकर हेदेखील सहभागी असल्याची कबुली दिली आहे. आरोपींना अधिक तपासासाठी बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.