जळगाव । गेल्या पंधरावर्षांपासून जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचाच जिल्हा परिषदेवर अध्यक्ष राहीला असून त्यांच्या कार्यकाळात केवळ माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील कामे करण्यात आल्याचा आरोप आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा वचननामा प्रसिद्ध करतांना केला. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असल्यानेच 50 टक्के निधी हा खडसे व महाजन यांच्या मतदार संघात खर्च करण्यात आला असल्याचे आमदार पाटील यांनी आरोप केला आहे. राज्यात ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष कार्य करीत आहे त्याच प्रमाणे त्यांनी जिल्हा परिषद चालविल्याचा आरोप यावेळी आमदार पाटील यांनी केला.
मोदींवर सर्वसामान्य नाराज
मोदी सरकारने 500 व 1000 च्या नोटा बंद केल्यानंतर नागरिकांसाठी 31 डिसेंबर रोजी मोदी नागरिकांसाठी काही भरीव मदत जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र, असे काही एक न झाल्याने ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाचा विषय संपला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. शेतकरी तसेच नागरिकांमध्ये भरतीय जनता पक्षाबाबत नाराजी असून त्यांनी दिलेले चॉकलेट 2 महिन्यांत संपलेले आहे. 31 डिसेंबर रोजी पंतप्रधान शेतकर्यांचा उतारा कोरा करतील या आशेने मोदींचे भाषण ऐकत होते परंतु मोदींनी 450 एकर जमिनीधारकांचे अल्प व्याज माफ करून शेतकर्यांच्या जखमांवर मिठ चोळल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकार्यांनी पक्षपातीपणे केला निधी वाटप
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा कोणा एका पक्षाचा नसतो तर जिल्ह्यांतील सर्व नागरिकांचा असतांना जिल्हा परिषदेमार्फेत केवळ जिल्हाध्यांक्षासह त्यांचे पालक म्हणजेच प्रमुख नेते यांचा विकास करण्यात आला असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. जिल्हाधिकार्यांनी शासनाचा जास्तीत जास्त निधी खडसे, महाजन यांच्या मतदार संघात दिल्याचे सांगितले.