50 lakh gold theft case: Khar police took custody of the accused from Bhusawal railway police भुसावळ : बांधकाम व्यावसायीकाकडे कामास असलेल्या नोकराला नियमित पगार मिळत नसल्याने त्या रागातून त्याने 50 लाखांच्या सोन्यासह रोकडवर डल्ला मारला होता. आरोपी गावाकडे निघाल्याची माहिती स्थानिक रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर 22564 अंत्योदय एक्स्प्रेसमधून आरोपीला रविवारी दुपारी दोन वाजता अटक करण्यात आली. आरोपी पकडण्यात आल्यानंतर खार पोलिसांचे पथक रविवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास दाखल झाल्यानंतर त्यांनी संशयीत राहुल रोशन कामत (25, मर्णेया, उमरकट, जि.मधुबनी, बिहार) यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.
घर मालक गावी जाताच साधली संधी
राहुल कामत हा संशयीत मुंबईतील खारघर भागातील बांधकाम व्यावसायीक मुकेश गांधी यांच्याकडे नोकर म्हणून कामाला होता मात्र पगार मिळताना होणारी हेळसांड पाहता आरोपीने त्या द्वेषातून गांधी दाम्पत्य 15 ऑगस्ट रोजी देवदर्शनाला गेल्याची संधी साधून गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी कटरद्वारे कपाटांचे कुलूप तोडून त्यातील 43 लाखांचे सोने, तीन लाख 84 हजारांची रोकड, महागड्या घड्याळी व फोन, फाईल्स असा ऐवज लांबवून पळ काढला होता. आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मुंबईत एक दिवस काढला व नंतर तो बोरीवलीहून सुरत व तेथून अंत्योदय एक्स्प्रेसने गावाकडे निघाला मात्र रविवारी दुपारी भुसावळात अंत्योदय एक्स्प्रेस आल्यानंतर जनरल बोगीतून त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले. खार पोलिसांचे उपनिरीक्षक कुंभारे व कर्मचार्यांनी रविवारी रात्री 12 वाजता आरोपीला अटक करीत मुद्देमाल ताब्यात घेतला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, उपनिरीक्षक ए.के.तिवारी, सहाय्यक फौजदार प्रेम चौधरी, प्रकाश थोरात व लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, ठाकूर, अजित तडवी, दिवाणसिंग राजपूत, धनराज लुल्ले आदींच्या पथकाने केली.