तळोदा। समाजात फोफावलेली व्यसनाधिनता दूर करून धार्मिकता रूजावी य उदात्त हेतूने शहरातील श्री दत्त भजनी मंडळ गेल्या अर्धशतकापासून कार्यरत आहे. हे मंडळ एकतारी भजनी मंडळ असून ढोलकी, झांज, मंजिरेचा सहाय्याने विविध भजने गायली जातात. शहरातील ज्येष्ठ दिवंगत आत्माराम संपत माळी, गिरधर माळी, मंगा रावजी माळी, जंगा रावजी माळी, रतिलाल बुलाखी पिंपरे आदींनी एकत्र येत 50 वर्षापूर्वी एकतारी दत्त भजनी मंडळ स्थापले व शहरासह तालुक्यात भजनाचे माध्यमातून व्यसनाधिनते विरूद्ध जनजागृतीचे कार्य सुरू केले. त्यांचा हा वसा आजही या मंडळाचे सदस्य यशस्वीपणे चालवित आहेत.
दर गुरूवारी अखंडीतपणे भरतो भक्तीचा मेळा
मंडळामार्फत शहरातील दत्त मंदिरात दर गुरूवारी रात्री भजन गायनाचा कार्यक्रम अखंडीतपणे सुरू आहे. मंदिरात दरवर्षी हरिनाम सप्ताह होते. त्यात भजन , किर्तन भागवत व इतर सांस्कृतिक कार्यक्रम साजरी केले जातात. तसेच श्री दत्त जयंती, हनुमान जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी, गणेशोत्म नवरात्रोत्सव अशा विविध प्रसंगी कार्यक्रम सादर केले जातात. सुख-दुःखाप्रसंगीही कार्यक्रम सादर केले जातात. या मंडळाने मुंबई, अकोला, बुलढाणा, खामगाव, नंदुरबार, शेळू, मध्यप्रदेशातील ठाणला, गुजरातमधील गोध्रा येथे कार्यक्रम सादर केले आहेत. मंडळाचे सदस्य हे शेतकरी, नोकरदार आदी क्षेत्रातील आहेत. आपल्या सुरेल व लयबद्ध भजनामधून जनजागृती सुरू आहे. मंडळाचे संजय बाबुलाल तांबोली, प्रभाकर रतीलाल पिंपरे, दिलीप मधुकर, धनीलाल रतिलाल हिवरे, अविनाश सूर्यवंशी, सुधाकर माळी, किरण सूर्यवंशी, प्रशांत सजनकार, आनंदा सुर्यवंशी, राजेंद्र माळी, राजेंद्र सजनकार आदी सदस्य धुरा सांभाळीत आहे.