50 वर्षीय इसमाचा डांभूर्णीत खून : संशयीताला अटक

यावल : तालुक्यातील डांभूर्णी येथे 50 वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. या घटनेत तान्या लोटन बारेला (50) यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी संशयीत आरोपी अखिलेश बळीराम बारेला (36) यास अटक केली आहे. या घटनेने डांभूर्णी गावात मोठी खळबळ उडाली.

यावल पोलिसांची डांभूर्णीत धाव
शुक्रवारी सायंकाळी तान्या बारेला व अखिलेश बारेला यांच्यातील कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने अखिलेश बळीराम बारेला (पिपल झपा, मध्यप्रदेश) याने लाकडी दांडुक्याचा वापर करीत तान्या लोटन बारेला याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. यावलचे निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, गणेश ढाकणे, सतीष भोई, विजय परदेशी यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.
संशयीत आरोपी अखिललेश बारेला यास अटक करण्यात आली. मृत तान्या बारेला हा रोजंदारी करून परीवाराचा उदरनिर्वाह भागवत होता. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, पाच मुली व पाच जावई असा परीवार आहे.