जळगाव । येथील सुधा काबरा ह्या गेल्या आठ ते दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेत असतात. त्यांनी अजुन एक उपक्रम सुरु केले आहे. ते म्हणजे ‘बॉक्स ऑफ हेल्प’च्या माध्यमातून त्यांनी मुलींचे निरीक्षणगृह (रिमांड होम) येथे रोटरी ईस्टच्या डिस्ट्रीक्ट गर्व्हनर डॉ. के. एस. राजन यांच्या हस्ते नुकताच बॉक्स लावण्यात आला. तसेच शहरातील 50 शाळांमधील स्वच्छतागृहात बॉक्स ठेवण्यात येणार आहे. वयात येणार्या शालेय मुलींच्या अनेक समस्या असतात. यात काही शारिरीक काही मानसिक असतात. मुलींनी याच समस्या मनमोकळेपणे सांगाव्या त्या सोडवण्याच्या उद्देशाने ‘बॉक्स ऑफ हेल्प’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मुली आपल्या समस्यांबाबत घरात बोलू शकत नाहीत. मुलींच्या याच समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण व्हावे अधिक अडचणी असल्यास त्यांच्याशी संवाद साधून तो त्रास कमी व्हावा, या उद्देशाने बॉक्स ऑफ हेल्प ग्रुप रोटरी क्लब ऑफ ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
आरोग्याविषयी मार्गदर्शन
या उपक्रमात महिला डॉक्टरांचा देखील सहभाग राहणार असून त्यांच्याद्वारे मुलींना मार्गदर्शन केले जाणार आहे. आरोग्याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. हेमांगी कोल्हे, डॉ. माधुरी कासट या मार्गदर्शन करतील. सुधा काबरा यांची ही मूळ संकल्पना आहे. सातवी ते दहावीच्या मुलींसाठी खासकरुन हा बॉक्स लावण्यात येणार आहे. मुलींच्या शाळेत हा बॉक्स लावण्यात येईल. यात मुलींंनी शारिरीक मानसिक आजाराविषयी होत असलेला त्रास किंवा शाळेतील इतरांकडून काही लैंगिक त्रास होतोय का? त्याची माहिती लिहून त्या बॉक्समध्ये टाकावी. ही सर्व माहिती गोपनीय असेल. या सर्व चिठ्या दर महिन्याला महिला मदतनीसच्या सहाय्याने काढल्या जातील. त्या चिठ्यांच्या आधारावर स्त्रीरोग तज्ज्ञ मुलींशी सविस्तर चर्चा करतील. अनेकदा पालकांजवळही मुली बोलत नाहीत, त्या डॉक्टरांशी संवादाच्या माध्यमातून आपल्या अडचणी मनमोकळ्या कशा मांडतील, असा या ’बॉक्स’ योजनेद्वारे प्रयत्न केला जाणार असल्याचे सुधा काबरा यांनी सांगितले.