जळगाव– शहरातील डॉक्टर महिलेची डायमंड असलेली तसेच विदेशातून खरेदी केलेली 50 हजार रुपयांची अंगठी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तब्बल 18 दिवसानंतर संबंधित डॉक्टर महिलेची अंगठी ही घरातच देव्हार्याच्या खाली सापडली असून या घटनेत काखेत कळसा अन् गावाला वळला या म्हणीचा प्रत्यय आला.
शहरातील जिल्हापेठ परिसरातील गांधीनगर येथे प्राजक्ता हर्षवर्धन जावळे ह्या राहतात. त्या भुलतज्ञ असून त्यांचे पती हर्षवर्धन जावळे हे आर्थोचे डॉक्टर आहेत. पती पत्नी दोघांच्या मालकीचे याच ठिकाणी जावळे हॉस्पिटल आहे. 2019 मध्ये डॉ. प्राजक्ता जावळे या विदेशात थायलंड येथील पटाया शहरात गेल्या होत्या. या शहरातील जेन्स गॅलरी दुकानातून त्यांनी 18 कॅरेट येलो गोल्ड डायमंड अंगठी विकत घेतली होती. ही अंगठी नेहमी डॉ. प्राजक्ता यांच्या हातात घातलेली असायची. 2 ऑक्टोंबर डॉ. प्राजक्ता यांनी अंघोळीदरम्यान ही अंगठी बाथरुमच्या बेसींनवर काढून ठेवली. अंघोळ झाल्यावर ती अंगठी घेण्यास विसरल्या. 4 ऑक्टोंबर रोजी त्यांनी अंगठीची आठवण आली असता, बाथरुमध्ये अंगठी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून आली नाही. घरात मुलीचे क्लास, घरकामासह स्वच्छतेसाठी कामगार येत असल्याचे आल्याने त्यांनी संशयित व्यक्त करुन जिल्हापेठ पोलिसात 50 हजार रुपये किंमतीची अंगठी घरातून अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. तब्बल 18 दिवसानंतरही आज गुरुवारी अंगठी ही डॉ. प्राजक्ता यांना घरात देव्हार्याखाली मिळून आली. डॉक्टर जावळे दाम्पत्याने तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांच्या सुचनेनुसार तपासअधिकारी निलेश यांनी पुढील कार्यवाही करुन याबाबत नोंद करुन घेतली.