मुंबई । रिझर्व बँक मोठ्या किमतीची नाणी काढणार आहेत, असे वृत्त या आधीपासून येत आहेत. ज्यामध्ये 100 रुपयांचे नाणे निघणार असल्याच्या वृत्ताने सर्वसामान्यांमध्ये मोठी उत्सूकता निर्माण झाली आहे. मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारे कोणत्याही मोठ्या किंमतीची नाणी रिझर्व बँक छापणार नाही, अशी माहिती सरकारी टाकसाळीने दिली आहे. माहितीच्या अधिकाराखाली दिली आहे. मोठ्या किमतीची नाणी छापली जाणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असा खुलासा सरकारी टांकसाळीने केला आहे. मनोरंजन रॉय यांनी सरकारी टाकसाळीकडे माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवली असता, त्यांना ही माहिती प्राप्त झाली.
50, 100, 200 ची नाणी येण्याची होती चर्चा
नोटाबंदीच्या निर्णयानंतर 2 हजार, 500 आणि 50 रुपयांची नवीन नोट आल्यानंतर सरकारी टांकसाळ 50, 100, 200, हजार व दोन हजारची नाणी काढणार आहे, असे वृत्त प्रसारीत होत होते. या नाण्यांची चित्रेही सोशल मीडियातून फिरत होती. प्रत्यक्षात ही नाणी बाजारात आलीच नाहीत. त्यामुळे यासंबंधी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवण्यात आली, तेव्हा सध्या 10 रुपयांची 68.9560 दशलक्ष नाणी, 5 रुपयांची 171.0750 दशलक्ष नाणी, 2 रुपयांची 281.2125 दशलक्ष नाणी, 1 रुपयाची 437.9225 दशलक्ष नाणी आदी एकूण 959.1660 दशलक्ष नाणी चलनात आहेत. ही नाणी मुंबई, कोलकाता, हैद्राबाद, नोएडा आदी
टांकसाळीतून काढली आहेत.
केवळ 10 रुपयांचे नाणे काढले
सरकारी टांकसाळीने सांगितले की,1995 मध्ये टांकसाळीने आतापर्यंत 10 पैस, 25 पैसे, 50 पैसे, 1, 10 व पाच रुपयांची नाणी काढली आहेत. 2000 नंतर टांकसाळीने 10 पैशाचे नाणे बंद केले. त्यानंतर 25 पैशांचे नाणेही बंद झाले. 2011 मध्ये अधिकृतपणे ते चलनातून रद्द केले. 2009-2010 मध्ये टांकसाळीने देशात पहिल्यांदाच 10 रुपयांचे नाणे काढले. 2012-13 या वर्षात टांकसाळीने 50 पैशांचे नाणे काढणे बंद केले. आता टांकसाळ केवळ 10 रुपयांचे नाणे काढते.