500 च्या बनावट नोटा देऊन फसवणूक

0

सांगली : विटा शहरात 500 रुपयांच्या बनावट नोटा देऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनेक भाजी विक्रेत्यांना 500 रुपयांच्या या बनावट नोटा खपवण्यात आल्या आहेत. यामुळे बनावट नोटा खपवणारी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीच्या विट्यातील भाजीमंडईतील काही विक्रेत्यांना 500 रुपयांच्या बनावट नोटा देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. गेल्या 8 दिवसांपासून भाजीमंडईत अनेक विक्रेत्यांना भाजी खरेदीच्या बहाण्याने 500 रुपयांच्या नोटा खपवण्याचा प्रकार घडला आहे. सुरुवातीला काही विक्रेत्यांना ही बाब लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागेल या भीतीने आपल्याकडे आलेल्या बनावट नोटा नष्ट केल्या. दरम्यान यानंतर 8 ते 10 आणखी भाजी विक्रेत्यांना 500 रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने एकच गोंधळ उडाला.

बाजारपेठेत धुमाकूळ घालणार्‍या या बनावट नोटा एकाच नंबरच्या असल्याचेदेखील दिसून आले आहे. ओरिजनल नोटांची कलर झेरॉक्स मारल्याप्रमाणे दोन्ही बाजू एकमेकांना चिटकवून या बनावट नोटा खपवण्याचा हा उद्योग असल्याचे समोर आले आहे. बनावट नोटा खपवणार्‍या टोळीने वयोवृद्ध शेतकरी व महिला विक्रेत्यांना लक्ष्य करत लाखो रुपयांचा या नोटाद्वारे फसवणूक केली आहे. याप्रकरणी विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तर 500 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे 500 रुपयांच्या नोटा प्रत्येकजण स्वीकारण्यास नकार देत आहे. तर बनावट नोटा विक्री करणार्‍या टोळीचा छडा लावण्याचे आव्हान आता विटा पोलिसांसमोर आहे.