500 टन प्रकल्पासाठी आयुक्तांची भेट

0

हडपसर । रामटेकडी औद्योगिक वसाहतमधील कचरा प्रकल्पाला हडपसर मधून तीव्र विरोध होत असताना आयुक्तांनी भेट देऊन अजून एक 500 टन कचरा प्रकल्प होणार असल्याचे अप्रत्यक्ष सांगितले, कचरा प्रकल्पावर नागरिकांची भावना तीव्र असताना नवा प्रकल्प म्हणजे महापालिकेने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. बुधवारी पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, घनकचरा व्यवस्थापनचे सुरेश जगताप आणि अधिकार्‍यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. आयुक्तांचा हा दौरा गुपचूप होता.

दिशा फाउंडेशनमधील जो प्रकल्प बंद आहे, त्या ठिकाणी नवीन प्रकल्प चालू करण्याबाबत ज्याची क्षमता रोज 500 टन इतकी आहे. त्याला दिशा प्रकल्प अधिकार्‍यांनी भेट दिली. याबाबत प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक योगेश ससाणे यांना पालिकेत माहिती मिळाली. त्यांनी तातडीने कचरा प्रकल्प गाठला. घनकचरा प्रकल्प आयुक्त सुरेश जगताप व महापालिका आयुक्त कुणाल कुमार येथे चर्चा करताना दिसले. तेव्हा तेथे त्यांच्याबरोबर गोव्यावरून दिशा प्रकल्प चालवणारी व्यक्ती आली होती.

प्रकल्पा विरोधात जनआंदोलन उभारणार
हडपसर रामटेकडी औद्योगिक वसाहतमध्ये नवीन कचरा प्रकल्प चालू करण्याचा कुटील ठाव महापालिका प्रशासन करत आहे. त्याबरोबर अजून 500 टन दररोज कचरा प्रकल्प सुरू करणार आहे. नगरसेवक योगेश ससाणे यांनी सर्व हडपसरवासियांचा या प्रकल्पास विरोध आहे, असे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकल्पाविरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाईल असे सांगितले. येथील कचरा डेपोमुळे कंपन्या व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, पूर्वीच या ठिकाणी महापालिकेचे दोन कचरा प्रकल्प असताना नव्याने होऊ पाहणार्‍या डेपोच्या विरोधात औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे मालक व कामगार तसेच शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. तसेच कचरा डेपो हटवा कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी डेपोला विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रसंगी न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. मात्र महापालिकेकडून या ठिकाणी पुन्हा पोलिस बंदोबस्तात मंगळवारी डेपोचे काम सुरू केल्याने हा प्रश्‍न पेटला आहे.

कचरा प्रकल्पास विरोधासाठी मोर्चा
रामटेकडी औद्योगिक वसाहतमधील कचरा प्रकल्पास तीव्र विरोध करण्यासाठी रविवार, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ससाणेनगर येथून हडपसर, पुणे-सोलापूर रस्ता, वैदुवाडी, रामटेकडी, नवीन बांधण्यात येणारा कचरा प्रकल्पापर्यंत जाहीर निषेध मोर्चा आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हडपसरचे नागरिक, सर्व सोसायट्यांचे सदस्य, महिला व विद्यार्थी सहभागी होणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व सर्वसामान्य नागरिक करणार आहेत. सर्व राजकीय पुढारी सामान्यांप्रमाणे सहभागी होतील.
– योगेश ससाणे, प्रभाग समिती अध्यक्ष – नगरसेवक

कचरा आंदोलन हाणून पाडण्याचा डाव
सत्ताधारी भाजपला बहुमत मिळाल्याने ते विरोधी पक्षाला व नागरिकांच्या हिताला जुमानत नाहीत. हे कचरा प्रकल्प हडपसर परिसरात होऊ नये ही लोकभावना असताना दडपशाही करून लादण्याचा प्रकार सुरू आहे. आता या विरोधात मोठे जनआंदोलन उभा केले जाईल आणि कचरा प्रकल्प गुंडाळण्यास सत्ताधारी भाजपला भाग पाडू.
– चेतन तुपे पाटील,
विरोधी पक्षनेते, महापालिका