500 विद्यार्थ्यांचा दाखला पोस्टाने पाठवला

0

पुणे । शुल्क न भरणार्‍या विद्यार्थ्यांवर झील एज्युकेशन सोसायटीने कारवाई केली आहे. संस्थेने सुमारे 500 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले असून, त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला टपालाने पाठवण्यात आला आहे. या दाखल्यावर शुल्क भरले नाही, असेही नमूद केले आहे. या विरोधात संतप्त पालकांनी शाळेसमोर शाळा प्रशासनाविरोधात निदर्शने केली. झील एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड रोडवरील ज्ञानगंगा शाळेच्या शुल्कवाढीविरोधात पालक एकवटले होते. गेली तीन वर्षे पालक आणि संस्था यांच्यात संघर्ष सुरू आहे.

शिक्षणहक्क कायद्याचा भंग
संस्थेने पालकांना शुल्क भरण्यासाठी पत्र पाठवले होते. मात्र, पालकांनी 30 हजार रुपये शुल्क भरण्यास नकार देत 25 हजार रुपये भरले. त्यामुळे संस्थेने ही कारवाई केली. या कारवाईविरोधात पालकांकडून शिक्षण मंत्री आणि शिक्षण उपसंचालकांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहे. उच्च न्यायालयाने 30 हजार रुपये शुल्क मान्य केलेले नाही. डीएफआरसीने सांगितलेले 25 हजार रुपये शुल्क भरले आहे. त्याशिवाय संस्थेने आमच्याकडून 10 हजार रुपये ठेव म्हणून घेतलेले आहेत. असे असतानाही आता मुलांना शाळेतून काढले आहे आणि त्यांच्या दाखल्यावर शुल्क न भरल्याचा उल्लेख केला आहे. शाळा शिक्षणहक्क कायद्याचा भंग करत आहे. शाळा प्रशासनावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

पालकच दिशाभूल करत आहेत
यासंदर्भात झील एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रा. जयेश काटकर यांनी सांगितले की, कायम विनाअनुदानित असलेली शाळा पालकांनी शुल्क न भरल्यास कशी काय चालवता येईल? 2015 मध्ये शुल्क वाढ केली होती. मात्र, तीन वर्षे पालकांनी शुल्क भरलेले नाही. तरीही आम्ही कारवाई केली नाही. संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने शुल्क न भरणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मुभा संस्थेला दिली आहे. एका वर्षाचे शुल्क भरून पालक आरोप करत आहेत. पालक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.