500 जावयांचे समूह भोजन, अनोख्या पद्धतीने पाहुणचार

0

पुणे । पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आंबाडे गावातही अनोख्या पद्धतीने अधिक मास साजरा करण्यात आला. या गावात एक-दोन नव्हे तर तब्बल 500 जावयांना एकत्रीत भोजन देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. सध्या अधिक महिना असल्याने गावकुसातल्या जावयांना मानपान देत त्यांचे सासरच्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या मानपानात किंचितही कसर शिल्लक ठेवली जात नाही. भोर तालुक्यातील आंबडे गावात तर चक्क 500 जावयांना धोंड्याचे जेवण देण्यात आले. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून आंबाडे गावात सामुहिकरित्या जावयांचा मान-सन्मान करण्याची पद्धत सुरु आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले 500 जावई आंबाडे गावात तळ ठोकून आहेत. यावर्षी गावकर्‍यांनी एकत्र येत सर्व जावयांना एकत्रीत जेवण देण्याचे ठरवले होते. त्यानुसार जावईबापुंसोबत लेकींचे कौतुकही मोठ्या थाटात करण्यात आले.

विशेष म्हणजे जावयांसोबत आलेल्या आंबाडे गावच्या लेकींचाही यावेळी यथोचित मान-सन्मान करण्यात आला. जावयांना फेट्याचा मान असतो. पण जावयांसोबत लेकींच्या डोक्यावरही फेटा बांधून तसेच त्यांना साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे चित्र आंबाडे गावात पाहायला मिळाले. या 500 जावयांसोबत लेकींचे स्वागत टाळ-मृदंगाच्या गजरात करण्यात आले. यावेळी जावयाला धोंड्याचे जेवण देण्यात आले. जावयांच्या ताटात धोंडा लपवून तो त्यांना शोधायला सांगतात. त्यानंतर जावई तो धोंडा हेरतात अन् मग त्यांना मानाचा धोंडा खाण्यासाठी गावकरी आग्रह करतात, अशा प्रकारे अधिक मास आंबाडे गावात साजरा करण्यात येतो.

सामुहिक मानपानाची प्रथा
प्रत्येक गावानुसार तसेच कुटूंबानुसार जावयाचे कौतुक करण्याच्या पद्धती बदलत असतात. कुणी सोन्या-चांदीच्या वस्तू देऊन तर कुणी अनारसे, धोंडे, पुरणपोळी असे पंचपक्वान्न देऊन जावयाचे कौतुक करत असल्याचे चित्र अधिक महिन्यात दिसून येते. मात्र आंबाडे गावच्या गावकर्‍यांनी पंधरा वर्षांपासून एकत्रीतपणे जावयांचे कौतुक करण्याची परंपरा कायम ठेवल्याने गावकरी एकत्र येत आंनदोत्सव साजरा करत आहे. त्यातून वैयक्तिकरित्या जावयांना मान-सन्मान देण्याच्या प्रथेला आंबाडे गावच्या ग्रामस्थांनी बगल देत नवा पायंडा पाडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.