मुंबई:-सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून 500 मीटरच्या आत असलेल्या दारूविक्री, बियरबारवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आस्थापना चालकांच्या नुकसानीसह राज्याच्या महसूलावर देखील मोठा परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत 500 मीटरच्या बाहेर आपले आस्थापना शिफ्ट करण्यासाठी कुठलीही फी घेतली जाणार नसल्याची घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 15 हजाराच्या वर आस्थापने राज्यातील बंद झाली असून याबाबत पॉईंट ऑफ इम्फर्मेशन द्वारे प्रताप सरनाईक यांनी मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी ना. बावनकुळे यांनी या निर्णयामुळे 25,491 पैकी 15,699 लीकर आस्थापने बंद होणार आहेत अशी माहिती दिली. तसेच या निर्णयामुळे सरकारचे 7 हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचे सांगितले.
मनपाने रस्ते आपल्या नावावर करावेत
– या निर्णयावर बोलताना ना. बावनकुळे म्हणाले की, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लीकर आस्थापने आहेत. त्यामुळे 2001 च्या निर्णयानुसार महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते अधिकाधिक प्रमाणात आपल्या नावावर करून घ्यावेत. यासाठी मनपाने अर्ज केले तर शहरातील आस्थापन्नाचा प्रश्न मिटू शकतो असे ते म्हणाले. दारूबंदीसाठीच्या निर्णयाचा आम्हाला विरोध करायचा नाही मात्र अनेक व्यावसायीक आणि रेव्हेन्यूचा देखील विचार करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.