धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर कारवाई ; कारवाईचा सुगावा लागताच पंटर पसार
शिरपूर- तालुक्यातील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर मध्यप्रदेशात वाहन जावू देण्यासाठी 500 रुपयांची लाच मागणार्या दोघा मोटार निरीक्षकांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री 9.30 वाजता अटक केल्याने लाचखोर अधिकार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मोटार वाहन निरीक्षक सचिन शिवाजी पाटील (39) व मोटार वाहन निरीक्षक गणेश सजन पिंगळे (दोन्ही अधिकारी वर्ग- 1) अशी अटकेतील आरोपींचे नाव असून कलेक्शन करणारा खाजगी पंटर मात्र पसार झाला आहे.
पंटरांच्या माध्यमातून बळजबरीने वसुली
शिरपूर तालुक्यातील हाडाखेडा तपासणी नाक्यावर तपासणीच्या नावाखाली वाहनधारकांची लूट होत असल्याच्या यापूर्वीही तक्रारी होत्या तर ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाने या संदर्भात धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. सर्व कागदपत्रे असतानाही केवळ तपासणीच्या नावाखाली पाचशे रुपये सक्तीने एन्ट्री घेतली जात असल्याची तक्रार होती. विशेष म्हणजे ही रक्कम वसुलीसाठी खाजगी पंटरांची नियुक्ती करण्यात आली. बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तक्रारदाराचा ट्रक हाडाखेड तपासणी नाक्यावर आल्यानंतर मध्यप्रदेशात जावू देण्यासाठी खाजगी पंटराकडून 500 रुपयांची मागणी करण्यात आल्यानंतर पथकाने दोघा मोटार वाहन निरीक्षकांना अटक केली तर अज्ञात पंटर मात्र कारवाईचा सुगावा लागल्याने पसार होण्यात यशस्वी झाला. सांगवी (शिरपूर तालुका) पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवन देसले, पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर व कर्मचार्यांनी केली.
ट्रकच्या छतावर झोपून केला सापळा यशस्वी
आरोपी मोटार निरीक्षकांना जाळ्यात हेरण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे व सहकारी अधिकारी तक्रारदाराच्या ट्रकमागील ताडपत्रीवर झोपले होते. आरोपी पैसे मागत असल्याचे संभाषण टेप झाल्यानंतर पथकाने अचानक ट्रकमधून उतरत आरोपींना अटक केल्याने खळबळ उडाली. पंटर पसार होण्यात यशस्वी झाला मात्र दोघे निरीक्षक जाळ्यात अडकले. या सापळ्यात ट्रकच्या क्लीनरला पंच करण्यात आले असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.