धुळे/ नवापूर । कोपर्डी घटनेतील अत्याचार्यांना फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, यासह इतर मागण्यांसाठी ‘एक मराठा लाख मराठा, जय शिवाजी, जय भवानी’ आदी घोषणा देत सकाळी मराठा क्रांती मोर्चातर्फे धुळे महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सीपार्कजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. माजी आ. राजवर्धन कदमबांडे, माजी आ. प्रा.शरद पाटील, मनोज मोरे यांच्यासह माजी महापौर मोहन नवले आदी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महिला – पुरुष सहभागी झाले होते. अर्धा-पाऊण तास हे चक्काजाम आंदोलन सुरु असल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनादरम्यान राजवर्धन कदमबांडे, प्रा. शरद पाटील, मनोज मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दुपारी त्यांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दहिवेल चौफुली अवरुद्ध
साक्री तालुक्यातील दहिवेल चौफुलीवर चक्काजाम करण्यात आला. सुमारे अर्धा तास वाहतूक रखडली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या. त्यावेळी तणाव वाढला. साक्रीचे पी.आय. सोनोने, दहिवेल औट पोस्टचे ए.पी.आय. पायमोडे, कॉ. कोतवाल, कॉ. वसावे, यांनी परिस्थिती हाताळली.
साक्री, शिरपूर तालुक्यातही महामार्गावर चक्काजाम
धुळे ग्रामीण व शहराचे आंदोलन येथील रेसिडेंसी पार्क येथे करण्यात आले. साक्री, शिरपूर या तालुक्यातही महामार्गावर चक्काजाम आंदोलन करुन निद्रीस्त शासनाला जागे करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चातर्फे न्याय्य मागण्यांसाठी राज्यभर सनदशीर व शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. परंतु या मागण्यांची अद्याप दखल न घेतल्याने आज जिल्हाभर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचीही दखल न घेतल्यास भविष्यात कायदा हातात घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. या मोर्चात जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नवापूरमध्येही मराठा समाजाचा एल्गार
नवापूर । नवापूर शहरात आज मराठा क्रांती मोर्चा तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजता नगरपरिषद प्रवेशव्दाराजवळ नवापूर शहरातील मराठा क्रांती कार्यकर्ते जमा झाले. यावेळी हायवे वर असंख्य वाहनांचा रांगा लागल्या होत्या. यावेळी विविध मागण्यांबाबत घोषणाबाजी केली गेली. यानंतर पोलिस निरीक्षक रामदास पाटील महामार्गावर आले. त्यांनी आंदोलनकारी लोकांशी संवाद साधत रस्ता सुरळीत केला. यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार प्रमोद वसावे यांना निवेदन दिले. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील, रवींद्र साळुंखे, आर. वाय. पाटील, हरिश्रंद्र सोमवंशी,डी.एम.बिरारी, तुषार मराठे, संजय शिंदे, विनोद मराठे, अरविंद पाटील, हितेश जाधव, सुरेश पाटील, दिपक मराठे,मनोज पाटील, प्रशांत बी पाटील,छोटु पाटील, अनिल वेडाईत, निलेश साळवे, महेन्द्र पाटील, अमोल पाटील, भालचंद्र पाटील, सतीष कुंवर, आशिष ठाकरे, आर. बी. मोरे, दिपक मराठे, ए. जी. पाटील, मनोज भैरव आदी उपस्थित होते . यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणुन पोलिस निरीक्षक रामदास पाटील सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा, संतोष भंडारे,दिपक पाटील, संगिता कदम, पो.का.निजाम पाडवी,मोहन साळवे, योगेश थोरात, दिलीप चौरे,रितेश हिदवे, जितेंद्र तोरवणे, मुकेश पवार, भिमराव भैरम, कृष्ण पवार, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले
दरम्यान नंदुरबार शहरातही महामार्गावर आंदोलन करण्यात येऊन अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. कोपर्डी प्रकरणातील मराठा समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील घटनेतील नराधमांना तत्काळ फाशी द्यावी, अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर करणार्यांना शिक्षेची व दंडाची तरतूद करावी, मराठा समाज आरक्षणाची बाब न्यायप्रविष्ठ असली तरी शासनाने भक्कमपणे बाजू मांडून आरक्षण मिळवून द्यावे, तसेच त्यासाठी केंद्र व राज्याच्या कायद्यात आवश्यक तरतुद व दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याऐवजी तेथे संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे संपूर्ण राज्यभर महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले.