कालपरवा, जळगावपासून अवघ्या 4-5 किलोमीटर दूर सावखेडा परिसरात असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमास भेट दिली. हे वृद्धाश्रम वाटतच नाही, तर ते एक वृद्ध लोकांचं गाव वाटतंय. या गावात सभ्यता, संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावनेला फार किंमत आहे. इथं राजकारण, सरकार, महागाई, भ्रष्टाचार अशा सध्या फारच चर्चेत असलेल्या गोष्टींवर पांचट गुर्हाळ गाळली जात नाहीत. इथ असणार्या प्रत्येक व्यक्ती हा एक सिनेमा आहे, एक पुस्तक आहे. प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे. मात्र, क्लायमॅक्स एकच.
वृद्धाश्रम, खरंतर या विषयावर आजवर अनेक समाजभान असणार्या लोकांनी लिहिलंय. अनेक फीचर लिहिले गेले असतील. शॉर्टफिल्म बनल्या, सोबतच अनेक सिनेमांमधूनदेखील प्रकाश टाकला गेला आहे. तसंतर ही समस्या आहे की उपाय? हादेखील प्रश्न जीवाला खात आहे. त्यामुळे माझ्या लिहिण्याने काही फरक पडेल असे अजिबात वाटत नाही. मात्र, यामुळे किमान माझ्या मनाला आणि माझ्या अवतीभवतीच्या काही लोकांना जरी फरक पडला तरी आपण काहीतरी केल्याचे फील नक्की येईल. कालपरवा, जळगावपासून अवघ्या 4-5 किलोमीटर दूर सावखेडा परिसरात असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमास भेट दिली. हे वृद्धाश्रम वाटतच नाही, तर ते एक वृद्ध लोकांचं गाव वाटतंय. या गावात सभ्यता, संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावनेला फार किंमत आहे. इथ असणार्या प्रत्येक व्यक्ती हा एक सिनेमा आहे, एक पुस्तक आहे. प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे. मात्र, क्लायमॅक्स एकच. खरंतर भारतासारख्या सभ्यता आणि संस्कृतीच्या गोष्टी करणार्या समाजात वृद्धाश्रम का आहेत? आणि असावी का? असा प्रश्न उपस्थित होतो.
तिथल्याच आजोबांनी सांगितलं, की तुम्ही फोटो का बरे काढत नाहीत? मी म्हटलं आवडत नाही बाबा, तर ते खूप मंदपणे हसले. म्हणजे वाढदिवस किंवा अशा वेगळ्या कारणांनी इथ व्हिजिट देऊन तिथे फोटोग्राफी करून टिमकी मिरवणार्या लोकांचा या लोकांना खरंच वीट आलाय? अस त्यांचं हास्य सांगून जात होतं. केशवस्मृती प्रतिष्ठान जळगावच एक सामाजिक वलय असणार स्वयंसेवी सामाजिक संघटन. अशा सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असलेल्या केशवस्मृतीने हे वृद्धाश्रम सुरू केले. एक माणूस म्हणून नियमितपणे इथली व्यवस्था करणे खरोखर फार जिकिरीचे काम आहे. मधुकरदादा इथले व्यवस्थापक आहेत. अतिशय प्रेमळ आणि व्यापक दृष्टिकोन असलेला माणूस. सर्व वृद्धांची अगदी आस्थेने चौकशी करून त्यांना लेकराप्रमाणे जीव लावतात. मातोश्री वृद्धाश्रमात दाखल असलेल्या प्रत्येक व्यक्तीत एक कथा आहे. त्यातली एक-दोन उदाहरण बिना नाव देता इथ देतोय. कारण नाव दिल्यावर त्यांच्या पोटच्या लेकरांना की, जे आज समाजात उच्चभ्रू म्हणून वावरत आहेत, अशांना त्रास व्हायला नको. कारण त्या लोकांना त्रास झाला म्हणूनच आज हे वृद्ध इथ देव कधी उचलतोय, याचीच वाट बघतोय, असे वाक्य म्हणत जिंदगी जगत आहेत.
एक आजोबा डोळ्यातून आटलेल्या अश्रूंना बाहेर काढत सांगतात, आठ-दहा बिघे जमीन विकून पोरांना शिकवलं. पोरं मुंबईला जायची म्हणून सगळं विकून टाकलं. पोरांची लग्न झाली. त्यांची पोरं मोठी झाली. मुंबईत बंगले घेतले. नातू अमेरिकेला नोकरी करताहेत. चार-पाच वर्षांपूर्वी बायको गेली आणि मला इथ आणून सोडलं. आता इथं फक्त मरणाची वाट बघतोय, असं सांगत होते. या वेळी माझ्या मनात असा क्रांतिकारी विचार आला की, या आजोबांचे फोटो काढावे आणि मोठमोठे डिजिटल काढून चौकाचौकांत लावावे किंवा मुंबईत त्या पोरांचा पत्ता घेऊन त्यांच्या बंगल्यासमोर लावावेत. एवढे भोगूनही ते आजोबा त्या लेकरांचे कल्याण व्हावे अशीच अपेक्षा बाळगत आहेत.
एक शिक्षक. जीवनभरात अनेक पोरांना घडवलं. चांगल्या पदावर विद्यार्थी पोहोचले. मुलालाही शिकवलं. पोरगा सरकारी अधिकारी झाला. बाप रिटायर झाला. पोराचं लग्न झालं. सहा महिन्यानंतर पिढ्या घडवणार्या या शिक्षक बापाच्या ताटातल्या भाज्या बदलायला सुरुवात झाली. पोटचं पोरगं म्हणून दहा वेळा चूक पोटात घातली. मात्र, अकराव्या वेळेला बापाचा स्वाभिमान जागृत झाला. बसस्थानकावरून पोराला फोन केला, पोरा मी निघालोय, शोधू नकोस, आनंदी राहा. 15 वर्षे झाली ते घरी गेलेच नाहीत. मातोश्रीच्या कुशीत आले, बाग फुलवली. प्रचंड स्वाभिमान. अशा एक नाही तर अनेक कथा. जीव कासावीस झालाय. मधुकरदादांनी एक भयंकर किस्सा सांगितला, शेवटच्या घटका मोजत असताना एका वृद्धाच्या पोराला फोन केला, म्हणाले जीव घरी जावा, अशी त्यांची शेवटची इच्छा आहे, तर पोरगा म्हणाला, इथ मेले काय आणि तिथे मेले काय, एकच की. तुम्हीच करून घ्या. मी पैसे पाठवून देतो. हे किती भयानक आहे हे सांगायची गरज नाही. म्हातारे झाले म्हणून प्रत्येक गोष्टीत कुरबुर करताहेत, आजारपण, सनकी स्वभाव, सासू-सुनाची भांडणे अशी अनेक कारणे सांगून वृद्धाश्रमात दाखल झालेल्या अनेक कथा वाचून सुन्न झालोय. हे एका मशागतीत व्यक्त होण्याजोगे अजिबात नाही. सुरुवातीलाच म्हटलं तसं प्रत्येक माणूस एक वेगळाच क्लासिकल सिनेमा आहे, मात्र, यांचा शेवट म्हणजेच क्लायमॅक्स एकच आहे.
– निलेश झालटे
9822721292