टेनिसपटूंसाठी संघटना अजूप काही करू शकेल

0

पुणे । व्यावसायिक टेनिस खेळणे खूप खर्चिक आहे. मला नेमके कुणाकडे बोट करायचे नाही; पण अखिल भारतीय टेनिस संघटना खेळाडूंसाठी आणखी खूप काही करू शकेल, असे मत डेव्हिस करंडक संघाचे नॉन-प्लेइंग कॅप्टन आनंद अमृतराज यांनी व्यक्त केले. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या एमएसएलटीए हार्ड कोर्टवर न्यूझीलंडविरुद्ध भारताची आशिया-ओशेनिया गटातील लढत होणार आहे. नूतनीकरण झालेल्या हार्ड कोर्टवर संघाचा सराव झाल्यानंतर ते बोलत होते.

आपल्या खेळाडूंना मदत करण्याची गरज
युकी भांब्री आणि साकेत मायनेनी अलीकडेच दुखापतींमधून तंदुरुस्त झाले आहेत, तर आदिल कल्याणपूर यांच्यासह अनेक खेळाडू परदेशात प्रशिक्षण घेत आहेत. अशा खेळाडूंना प्रगती करता यावी म्हणून पाठिंब्यासाठी काय शिफारशी कराल, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट भाष्य केले. ते म्हणाले, की परदेशातील स्पर्धांसाठी प्रवास करणे, प्रशिक्षण घेणे आदींसाठी बराच खर्च येतो. आपल्या खेळाडूंना मदत मिळाली तर चांगलेच होईल. संघटना, प्रायोजक किंवा कंपन्या अशा कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा.

अमृतराज यांची ही अखेरची लढत
लिअँडर पेस कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय टेनिसचे भवितव्य चांगले असल्याचे सांगून ते म्हणाले, की युकीसह साकेत व रामकुमार रामनाथन या तिघांमध्ये जागतिक क्रमवारीत टॉप हंड्रेडमध्ये येण्याची क्षमता आहे. युकीने ही कामगिरी करून दाखविली आहे, तर साकेत त्या दिशेने वाटचाल करीत आहे. रामकुमारही प्रगती करतो आहे. आनंद अमृतराज यांची ही अखेरची लढत आहे. त्यांच्या जागी यापूर्वीच महेश भूपतीची नियुक्ती झाली आहे. मायदेशातील लढतीत विजय मिळवून कारकिर्दीची विजयी सांगता करायला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. न्यूझीलंडच्या संघाला कमी लेखणार नाही. 2015 मध्ये ख्राईस्टचर्चमधील लढतीत भारतीय संघाला विजयासाठी झगडावे लागले होते. त्यावेळी न्यूझीलंडच्या संघाची क्षमता लक्षात आली होती. एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करू, असे त्यांनी नमूद केले.