जळगाव। शहरातील चोपडा मार्केटमधील सुरेश पुंडलिक पाटील यांच्या गोदामातून 50 लाखांच्या सिगारेटसह 2 लाखांची रोकड चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. दरम्यान, त्यास आज न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीचे अधिकार राखून संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एपीएमसी पोलिसांनी केला होता पर्दाफाश
चोपडा मार्केटमध्ये असलेल्या सुरेश पाटील यांच्या मालकीचे गोदामातून 26 जानेवारी 2017 रोजी चोरट्यांनी 50 लाखांच्या सिगारेटसह 2 लाख लांबविले होते. यावेळी चोरटे मालवाहु गाडीत सिंगारेट बॉक्स भरतांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर जिल्हा पेठ पोलिस चोरट्यांचा शोध घेत होती. परंतू पुणे, मुंबई येथेही या सिगारेट टोळीने डल्ला मारल्यानंतर नवी मुंबई एपीएमसी पोलिसांच्या पथकाने त्यांच्या 12 ऑगस्ट रोजी मुसक्या आवळल्या. सिगारेट चोरणारी टोळी ही मुळची राजस्थान येथील असल्याचे समोर आले. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता त्यांनी मुंबई येथील चोरलेल्या सिंगारेट पैकी 15 लाखांच्या सिंगारेट काढून दिल्या होत्या. एपीएमसी पोलिसांनी केलेल्या चौकशीत देखील टोळीने जळगावात चोरी केल्याची कबूली दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी एपीएमसी पोलिसांशी भेट घेवून संशयितांची माहिती घेतली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार संशयितांना ताब्यात घेणार होते. दरम्यान, आज मंगळवारी जिल्हा पेठ पोलिसांनी मुख्य संशयित तेजस चंपालाल उनेजा (वय-33 रा. हॅपी कॉलनी, गोसावी वसाहत कोथरुड पुणे, मुळ रा.मालावाड जंक्शन जि.राजस्थान) याला अटक केली. संपूर्ण चौकशीसाठी तसेच अन्य साथीदार मुकेश मोहन चौधरी उर्फ राजु राठोड, चंपालाल चोगाराम वर्मा, सुरेंद्र अस्लारामजी चौधरी यांना ताब्यात घेण्यासाठी संशयित तेजस याला मंगळवारी दुपारी न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यात न्या. पाटील यांनी तेजस उनेजा याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.