दुध फेडरेशन समोरील रेल्वे गेटला बसची जोरदार धडक

0

जळगाव । जळगावातील दुध फेडरेशन समोर असलेल्या सुरत रेल्वे गेट सकाळी 9.12 वाजता गेटवाल ललित गौतम बंद करीत होते. यावेळी चोपडा आगाराच्या बसचालकाने सुरत रेल्वे गेटला धडक दिली. बसच्या जोरदार धडकेत रेल्वे गेट तुटून पडल्याने चार तासानंतर गेटची दुरूस्ती करण्यात आली. अचानक गेट तुटल्याने ललित गौतम यांच्या हाताला दुखापत झाली. यामूळे नवजीवन एक्सप्रेससह आठ गाड्या लेट झाल्या.

जळगावकडून चोपडा येथे राज्य परिवहन महामंडळाची बस (एम.एच.40 एन 9864) जात होती. चोपडा आगाराच्या बसवर चालक म्हणून संजय पुंडलिक पाटील होते. ही बस सुरत रेल्वे गेटजवळ आली. त्याचवेळी सुरतकडे जाणार्‍या नवजीवन एक्सप्रेस येत असल्याने गेटवाल ललित गौतम यांनी गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. भरधाव वेगाने असलेल्या बसचालक संजय पाटील यांचे बसवरिल नियंत्रण सुटले. बसचालक संजय पाटील यांनी दुधफेडरेशनच्या साईडने असलेल्या रेल्वे गेटला धडक दिली. बसची धडक एवढी जोरदार होती की लोखंडी गेट तुटून पडले. दरम्यान गेट बंद करीत असलेले गेटवाल ललित गौतम यांच्या हाताला दुखापत झाली. अचानक गेट तुटल्याने तारा व स्प्रिंग त्यांच्या हाताला लागले. ही घटना सकाळी 9.12 वाजेच्या सुमारास घडली.

नवजीवन एक्सप्रेस आऊटरला थांबून
सुरत रेल्वे गेट तुटले त्यावेळी आऊटरला सुरतकडे जाणारा नवजीवन एक्सप्रेस आला. मात्र तुटलेले गेट आणि वाहतुकीच्या कोंडीमूळे एक तास एक्सप्रेसला तेथेच थांबावे लागले.
आठ गाड्या लेट सुरतकडे जाणार्या व येणार्‍या असे 8 रेल्वे गाड्या उशीरा झाल्यात. यामध्ये डाऊनचा हावडा अहमदाबाद एक्सप्रेस, बीसीएन एचएल ही मालगाडी, तर अपचे नवजीवन एक्सप्रेस, ताप्तीगंगा एक्सप्रेस वा दोन मालगाडी लेट झाल्यात. यामूळे प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

चार तासाच्या प्रयत्नानंतर वाहतुक सुरळीत
सुरत गेट तुटल्यानंतर गेटवाल यांनी जळगाव उपस्टेशनला कळविले. यावेळी सिंग्नल मेंटन्सचे कनिष्ठ अभियंता ए.बी.कोलते यांच्यासह पथक घटनास्थळी पोहचले. सुमारे चार तासाच्या प्रयत्नानंतर गेट जोडण्यात आले. दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास डाऊनची बिकानेर एक्सप्रेस जाई पर्यंत काम सुरु होते. दरम्यान अपघातानंतर रेल्वे पोलीस उपनिरीक्षक कुलदिपसिंग यांच्यासह पोहेकॉ रंगलाल जाधव, चंदनसिंग, निलेश पाटील हे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकासह शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी सुरळीत केले. यानंतर रेल्वे पोलीसांनी बसचालक संजय पाटील व वाहक या दोघांना ताब्यात घेतले. आणि रेल्वे कायद्याअंतर्गत कारावाईसाठी भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले.