प्रभाकर मुराळकर यांचे निधन

0

जळगाव । सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर मुराळकर यांचे शुक्रवारी 4 रोजी रात्री दहा वाजता पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असतांना दु:खद निधन झाले. ते 62 वषार्च होते. मुराळकर यांनी प्रारंभी दैनिक देशदूतमध्ये पत्रकारिता केली. त्यानंतर सन 1984 मध्ये मुराळकर हे माहिती खात्यात माहिती सहाय्यक म्हणून रुजू झाले. त्यांनी विभागीय माहिती कार्यालय, नाशिक, जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक, धुळे, जळगाव आणि उप माहिती कार्यालय, मालेगाव येथे काम केल्यानंतर त्यांना माहिती अधिकारी म्हणून बढती मिळाली. काही काळ ते जळगाव येथे काम केल्यानंतर त्यांनी पुणे, सिंधुदुर्ग, ठाणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले. त्यांची मंत्रालयात मुंबई येथे नियुक्ती झाली होती. सेवेच्या शेवटी नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी काम केले.

मे-2014 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते पुणे येथे स्थायिक झाले होते. पेठे विद्यालयातील विद्यार्थीप्रिय सेवानिवृत्त शिक्षिका छाया मुराळकर या त्यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगा, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिकमध्ये काम कारतांना मुराळकर यांचे अनेक सामाजिक संस्थांना सक्रिय सहकार्य होते. मुराळकर परिवाराच्या दु:खात माहिती खात्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत.