बुधवारी मुंबईत काँग्रेसने म्हणजे संजय निरूपम यांनी आपल्या पक्षाचे महापालिका निवडणुकीचे अर्धेअधिक उमेदवार जाहीर करून टाकले. त्यात किती मराठी वा अन्य लोकांचा समावेश आहे, ते तपासण्याची गरज नाही. त्यांनी इतक्या लवकर यादी जाहीर केली, यातच त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. साधारण यापूर्वी म्हणजे अगदी मागल्या पालिका मतदानातही इतक्या वेगाने काँग्रेसच्या इच्छुकांना न्याय मिळालेला नव्हता. सहसा कुठल्याही निवडणुकीसाठी बिगरकाँग्रेसी उमेदवार खूप आधीच जाहीर व्हायचे. पण काँग्रेसच्या उमेदवारांची यादी अनेकदा अर्ज भरायची मुदत संपून गेल्यावरच जाहीर होत असे. कारण काँग्रेस पक्षाचे जे बळ होते, त्यामुळे तिथे उमेदवारी मिळवण्यासाठी झुंबड उडालेली असे. पक्षाचे तिकीट मिळाले मग यशाची शक्यता मोठी असे. म्हणूनच यश मिळवायचे तर काँग्रेसची उमेदवारी, असेच एक समीकरण होते. त्या अनेक इच्छुकातून एकाची निवड करणे श्रेष्ठींनाही अशक्य असायचे. कारण कुणा एकाला कल दिला, म्हणजे बाकीचे इच्छुक नाराज व्हायचे. त्यातून मग बंडखोरी व्हायची. अर्थात कोणीही उपटसुंभ दावा करणारा नसायचा. त्याचे थोडेफार स्थानिक बळ असायचे. पण एकदा त्याला उमेदवारी नाकारली तर तो बंड करणार आणि त्याने पाचसातशे मते खाल्ली, तरी अधिकृत पक्ष उमेदवाराची तितकी मते बाद होण्याचा धोका असायचा. साहजिकच शक्य तो सर्वांना टांगून आशा दाखवयाच्या, असाच खेळ चालत असे. मात्र, त्यापैकी नाराजांनी बंड करू नये याचीही काळजी घेतली जायची. साहजिकच अशा नाराजांना खेळवत ठेवून निवडलेल्यांना थेट अधिकृत उमेदवार म्हणून पत्र दिलेले असायचे. त्यांनी त्याबद्दल वाच्यता करू नये याचीही काळजी घेतली जायची. यंदाच्या मतदानात काँग्रेसला तशी भीती वाटलेली नाही, याला निरूपम यांचा आत्मविश्वास असे म्हणूनच ठरवावे लागते.
निरूपम यांचा हा आत्मविश्वास म्हणजे काँग्रेस पक्षाकडे फारसे इच्छुक नाहीत. म्हणून कोणीही फारसे बंड करून खर्या अधिकृत उमेदवाराला पाडण्याचे भय नसावे. ते भय नाही, याचे आणखी एक कारण असेही असावे, की बहुतांशी उमेदवार पडण्याचीच निरूपम यांना खात्री असावी. तशीच इच्छुकांनाही खात्री असल्यानेच काँग्रेसकडे तिकीट मागण्याचीही गर्दी घटलेली आहे. उलट तशी स्थिती आज शिवसेना व भाजपाकडे आलेली आहे. या वेळी उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपत चाललेली आहे, तरी भाजपा वा सेनेने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. कारण आपल्यातले नाराज अन्य कुठल्या पक्षाकडे जाऊन उमेदवारी मिळवतील, असे भय या जुन्या मित्र पक्षांना सतावत असावे. याखेरीज आणखी एक ताप आहे तो नवागतांचा! सध्या जोरात असलेल्या भाजपा व शिवसेनेने जिंकण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांच्याकडे इच्छुकांची गर्दी आहे. पण त्यामुळेच आधीपासून पक्षात काम करणार्या जुन्या इच्छुकांची कोंडी झालेली आहे. यापूर्वी भाजपा किंवा शिवसेनेतून उमेदवारी करून अनेकदा पराभव पचवलेलेही भरपूर निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्थानिक पातळीवर पक्षाची संघटना उभी करताना पराभव पचवत काही मतदार निर्माण केलेला आहे. या वेळी पक्षाच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन कधीतरी नगरसेवक होण्याचे स्वप्न त्यांनी कित्येक वर्षे रंगवलेले आहे. साहजिकच अशावेळी अन्य पक्षांतून आयात झालेला कोणीही भाजपा वा शिवसेनेचा उमेदवार झाला, तर अशा निष्ठावंताला अन्याय झाल्यासारखे वाटणे स्वाभाविक असते. त्यांना मग पक्षापेक्षा आपली जाणारी संधी मोलाची वाटते आणि ते बंडाचा झेंडा खांद्यावर घेतात. त्याच कारणास्तव शिवसेना किंवा भाजपाने अजून उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उलट अजून अन्य पक्षांतून कोणी आयात होत असेल, तर त्याची प्रतीक्षा चालू आहे.
याच दरम्यान पक्षातल्या इच्छुक वा निष्ठावंतांना टांग मारण्याचा श्रेष्ठींनी शोधलेला नवा उपाय कानी आला, तो धक्कादायक आहे. चोरी वा दरोड्यासाठी नव्या तंत्राचा वापर केला जातो हे ऐकलेले होते. पण पक्षातल्या निष्ठावंतांचा काटा काढण्यासाठी श्रेष्ठीही तंत्रज्ञानाचा उपयोग सराईतपणे करू लागल्याची नवी माहिती हाती आलेली आहे. जोमात असलेल्या एका पक्षाने मागल्या दोन वर्षांत सातत्याने अन्य पक्षातून भरती केलेली आहे. त्यामुळे त्यांचे दीर्घकालीन निष्ठावंत सतत नाराज राहिलेले आहेत. अशा पक्षाच्या श्रेष्ठींनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने उमेदवारांची निवड करण्याचा घाट घातला आहे. ज्याच्या विजयाची शक्यता जास्त आहे, अशाच व्यक्तीला उमेदवारी मिळेल असे सांगितले जात होते. त्यासाठी प्रत्येक प्रभागातून म्हणे इच्छुकांबद्दल लोकमत आजमावणारी चाचणी घेण्यात आली. त्यातून जिंकू शकणार्या उमेदवारांना बाजूला करण्यात आले. स्थानिक जनमानसात स्थान असलेल्याच इच्छुकांचा चाचणीसाठी विचार झाला. पण असे करताना ठरावीक इच्छुकांनाच चाचणीत वगळण्यात आले. साहजिकच त्यांचे नावच तिथल्या चाचणीत समोर आले नसल्याने, त्यांना जनमानसात आधार नसल्याचा निष्कर्ष काढून खड्यासारखे वगळले गेले. परिणामी, निवडीपूर्वीच त्यांचा स्पर्धेतून पत्ता कापला गेला. श्रेष्ठींनी ज्यांना उमेदवारीची हमी देऊन पक्षात आणलेले आहे, अशा उपर्यांना संधी देण्यासाठी जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना वगळताना अशा रीतीने मतचाचणी तंत्राचा चतुर उपयोग अनेक महानगरात झाल्याचे कळते. त्यामुळे उमेदवार निवडीतून हे जुने कार्यकर्ते खड्यासारखे बाजूला फेकले गेले आहेत. सत्तेची साठमारी किती खालच्या म्हणजे वॉर्डाच्या पातळीवर गेली आहे, त्याची यातून प्रचिती येते. खरा कार्यकर्ता त्यामुळे वंचित झाला असून, उपर्यांनी पक्षावर कब्जा मिळवल्याच्या तक्रारीही ऐकू येत आहेत.
खरा वा निष्ठावान कार्यकर्ता कसा ओळखावा? ज्याने पक्षाचे नामोनिशाण कुठे नसताना व पराभवाचीच हमी असताना, ते चिन्ह वा झेंडा खांद्यावर घेऊन त्या भागात पक्षाची मतदाराला ओळख करून दिली, तो निष्ठावान असतो. कारण तो सत्तालोभी नसल्याचे त्याच्या वागण्यातूनच साफ होते. कारण पक्ष पराभूत होत असताना त्या पराभवाची चव चाखायला त्याने पुढाकार घेतलेला असतो. पक्षाचा पाया घालताना त्याचा वापर झालेला असतो. त्यावेळी पक्षाला जिंकणारे उमेदवार मिळत नसतात आणि असे जिंकणारे उमेदवार तेव्हा जिंकण्याची हमी असलेल्या पक्षाकडे रांग लावून उभे असतात. मात्र, निष्ठावान कार्यकर्त्याने अनेक पराभव पचवून पक्षाला लोकप्रियतेच्या वाटेवर आणले, मग पक्षाच्या श्रेष्ठींना जिंकणारे उमेदवार हवेसे वाटू लागतात. तेव्हा निष्ठा बाजूला सारली जाते आणि पराभवाची चव चाखलेल्यांना उकिरड्यात फेकून, जिंकणार्यांना सामावून घेण्याच्या कसरती सुरू होतात. तशी स्थिती पूर्वी काँग्रेस पक्षाची होती. सध्या शिवसेना व भाजपा यांच्यात अशी स्थिती आलेली आहे. म्हणूनच त्या पक्षांना अर्जाची मुदत संपत चालली असतानाही उमेदवारांच्या याद्या जाहीर करता आलेल्या नाहीत. 1985 सालात लोकसभा विधानसभेचा पराभव पचवून उभ्या असलेल्या शिवसेनाप्रमुखांनी, महापालिका निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज मागवले नव्हते. जिथे शाखा होती आणि शाखाप्रमुख होता, त्याला थेट उमेदवारी देऊन टाकली होती. त्यातून शिवसेना सत्तेपर्यंत पोहोचली आणि सेनेतील नवे नेतृत्व त्यातूनच उदयास आले. मग आज त्याच भाजपा वा सेनेला उमेदवार जाहीर करण्यापूर्वी हमखास जिंकून येणार्यांची प्रतीक्षा कशाला करावी लागते आहे? तो जिंकण्याचा आत्मविश्वास आहे, की आपल्यातले नाराज ़फुटण्याच्या भीतीचा आत्मविश्वास आहे? राजकारण किती घसरगुंडीला लागले आहे त्याचीच ही प्रचिती नाही काय?
रोजनिशी
भाऊ तोरसेकर