2016 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने दिलेल्या एका अहवालानुसार मुंबईत दरदिवशी चार लाखांहून अधिक नोकरदार महिला रेल्वेनेे प्रवास करतात, यातील प्रत्येक पाचपैकी चार महिलांना पुरुषांच्या छेडछाडीला, अपमानास्पद शेरेबाजी, सहेतूक स्पर्शांना सामोरे जावे लागते, असे स्पष्ट केले होते. 2017 च्या पहिल्याच महिन्यात 15 दिवसांच्या गॅपने रेल्वेस्थानकांत घडलेल्या दोन मोठ्या घटनांकडे तितकेच गांभीर्याने घेण्याची गरज वाटते आहे. कल्याण स्थानकावर प्लॅटफॉर्म बदलल्याच्या धांदलीत असणार्या एका महिला जिम ट्रेनरला शेजारून जाणार्या प्रवाशाने आधी शेरेबाजी आणि नंतर अंगचटीला येत थेट विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने या इसमाला दोन थोबाडीत दिल्या, यानंतर त्यानेही तिला मारहाण केली. अनेकांनी तर त्यांचे काही तरी लफडे असेल, जाऊ दे तिकडे, असे म्हणत तिथून पलायन करणेच पसंत केले. यापूर्वी कुर्ला स्थानकांत एका साखळीचोराने एका महिलेची साखळी हिसकावली आणि तिला चक्क चालत्या रेल्वेखालीच ढकलून दिले… संपली बिच्चारी..तीन महिन्यांची प्रेग्नंट होती… अशा कृत्रिम अपघाताच्या बळी पडलेल्या महिलांच्या कच्च्या बच्च्या मुलांचे, आईबापांचे काय? त्यांनी कोणाकडे न्याय मागायचा आणि हा न्याय मिळेलच याची खात्रीही नाही.
नुकतेच पुण्यातील इन्फोसिस या बड्या आयटी कंपनीत सुरक्षा रक्षकाने एकीचा बळी घेतला, तिच्या पालकांनी, नातेवाइकांनी यात कंपनीच्या अधिकार्यांचाही समावेश असल्याचा आरोप केला आहे, यापूर्वीही याच कंपनीत महिला सुरक्षा कर्मचार्याला अशा प्रकारच्या शोषणाला बळी पडावे लागले आहे. तत्पूर्वी तळेगाव पुण्यातही आयटी अभियंता तरुणीची हत्या करण्यात आली, मागील पाच वर्षांचा आढावा घेतला तर एकट्या पुण्यातील आयटी पार्कमध्ये जीव गमवावा लागलेल्या मुलींची सख्या धक्का बसावा इतकी मोठी आहे. महिला अत्याचाराच्या घटना आता एकतर्फी राहिलेल्या नाहीत, हे यातलं गांभीर्याने विचार करायला लावणारे सत्य आहे. एका वकील मित्राने परवा चर्चांच्या ओघात, हल्ली सर्वात सोपी आणि सहजपणे उपलब्ध असणारी गोष्ट कोणती असेल तर ती आहे, मोफत सेक्स… ऐकूनच शहारे आणणारा हा विषय त्याने खूप सोपा करून सांगितला… विवाहबाह्य संबंध हे आता कोणी गांभीर्याने घेत नाही, बढती, पगारवाढ, राजकीय वर्चस्व, ईप्सित साध्य करणे, अधिक श्रीमंत होणे, नवर्याचे बाहेरख्याली संबंध आहेत, मग माझे का नाहीत, उच्चशिक्षण, गावातून शहरांत राहायला येणे आदी अनेक किरकोळ वाटणार्या कारणांकरिता फक्तमोठ्या शहरांतच नाही, तर ग्रामीण भागातूनही अंगवस्त्रांच्या प्रथा मोठ्या अभिमानाने बाळगल्या जातात, शहरात याला सो कॉल्ड मैत्रीचे, सोल फ्रेंडचे गोंडस नाव दिले जाते.
पाश्चिमात्यांचे अनुकरण करताना त्यांना नावे ठेवता ठेवता आपण त्यांच्याप्रमाणेच वस्त्राप्रमाणे नाती बदलू लागलो आहोत, हे करताना कोणाच्या मनाचा, विचारांचा आदर करणे जाऊ दे, किमान भान ठेवण्याचे औदार्यही आपण विसरत आहोत… या अशा स्पर्धेत टिकून राहण्याकरिता, बहिणाबाई म्हणतात तसे पुरुषाचा कावा मला येडीला काय ठावा, हे वेळीच ओळखून, माझ्या शीलाचे, माझ्या विचार – आचारांचे रक्षण मीच करणार, माझ्या वागण्याचा काय परिणाम होईल तोही मीच भोगणार आणि याचे दूषण मी कोणालाही देणार नाही. मात्र, माझी चूक नसताना जर कोणी माझ्याकडे वाकड्या नजरेने बघेल, त्याचे डोळे काढून त्याच्याच हातात देण्याची धमकही मी बाळगणार… हे आता प्रत्येकीने, प्रत्येक बाईने आणि आईने मनावर ठसवण्याची वेळ आली आहे.
आयटी कंपन्या, खासगी वा सरकारी नोकरी, घर वा बाहेर प्रवासात वा कार्यालयात, अगदी गर्भातही आम्ही सुरक्षित नाहीत, हेच जणु घडणार्या घटना ओरडून ओरडून सांगताहेत… याला जशी पुरूषी मानसिकता कारणीभूत आहे, तसेच वर्चस्ववाद, चंगळवाद, वाढता स्वैराचार आणि आभासी प्रतिमांच्या मागे पळण्याची स्पर्धा यात टिकून राहण्याकरिता तरूणी, विवाहीत महिलाही वाट्टेल त्या मार्गाने जात आहेत, त्यातूनच शोषणा व्यवस्था अजून बळकट होते आहे. ही अस्वस्थता पाहून भय इथले संपत नाही… असेच म्हणावेसे वाटते.
संवाद
– योगिनी बाबर
9960097266