5 कोटी 24 लाख पंचायत समितीला वितरीत
पुणे : जिल्हा परिषदेच्या अपंग कल्याण निधीतून दिव्यांगांना घरकुलासाठी अनुदान देण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. त्यानुसार 2018-19 मध्ये जिल्ह्यातील 524 दिव्यांगांना विनाअट घरकुलाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी एम. एस. घुले यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात अपंगांसाठी 3 टक्के निधीची तरतूद केली आहे. परंतु, हा निधी कमी असून तो वाढविण्यात यावा, अशी मागणी अपंग व्यक्ती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यानंतर अध्यक्ष विश्वासराव देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 5 टक्क्यांपर्यंत ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, समाजकल्याण विभागाकडून घरकुल योजनेमध्ये आतापर्यंत 524 दिव्यांगांच्या घरकुलाला मंजुरी दिली असून, प्रत्येक लाभार्थ्याला एक लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 5 कोटी 24 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, हे अनुदान पंचायत समितीकडे वितरीत करण्यात आले आहे. तसेच या योजनांचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवकाते यांनी केले आहे.
दुर्धर आजारावरील उपचारासाठी मिळणार अर्थसहाय्य
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दुर्धर आजार झाल्यावर अनेकांकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे यावर्षीपासून अपंग कल्याण निधीतून दुर्धर आजार झालेल्या व्यक्तींना वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले असून, मंजूर लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.