कलम 88 अन्वये 42 पतसंस्थांची चौकशी पूर्ण : 907 व्यक्तींवर गुन्हे
जळगाव : जिल्ह्यातील 25 लाख कर्जदारांकडे 525 कोटींची थकबाकी असुन कलम 88 अन्वये 42 पतसंस्थांची चौकशी पूर्ण झाली आहे. आत्तापर्यंत 907 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर 351 कोटी 88 लाख रूपयांची जबाबदारी निश्चीत करण्यात आली आहे. यासंदर्भात सहकार विभागामार्फत कर्जवसुलीची कार्यवाही सुरू आहे.
पतसंस्थाचालकांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील अनेक पतसंस्था अडचणीत आल्या. या पतसंस्था अडचणीत आल्यानंतर ठेवीदारांचे कोट्यावधी रूपये अडकले. शासनाने त्यावेळी अर्थसहाय्य करून ठेवीदारांना त्यांचा पैसा परत करण्याचा व पतसंस्था अडचणीतुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात 178 पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. आत्तापर्यंत 73 पतसंस्था अडचणीतुन बाहेर पडल्या असुन 105 पतसंस्था अद्यापपर्यंत अडचणीत आहे. जिल्ह्यात 1 कोटी 73 लाख कर्जदारांकडे 1054 कोटी 82 लाख रूपयांची थकबाकी होती. त्यापैकी 1 लाख 48 हजार कर्जदारांकडुन 525 कोटी 79 लाख रूपयांची वसुली करण्यात आली. 25 लाख कर्जदारांकडे 525 कोटींची थकबाकी आहे.
8 हजार 523 मालमत्तांवर बोजे
जिल्ह्यातील थकबाकीदारांकडुन कर्जवसुली करण्यासाठी सहकार विभागामार्फत मालमत्तांवर बोजे देखिल बसविण्यात आले. 8 हजार 355 प्रकरणांमध्ये 8 हजार 523 मालमत्तांवर बोजे बसविण्यात आले आहे. तर 22 हजार 851 प्रकरणांमध्ये 383 कोटींची जंगम जप्ती करण्यात आली. यातील काही मालमत्तांचा लिलावही करण्यात आला आहे. कलम 88 अन्वये जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या 45 पतसंस्थांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी 42 पतसंस्थांची चौकशी करण्यात आली असुन दोन पतसंस्थांची चौकशी सुरू आहे. तर एका पतसंस्थेने स्टे मिळविला आहे. कलम 88 अन्वये जिल्ह्यातील 539 व्यक्तींवर 300 कोटी 19 लाख रूपयांची जबाबदारी निश्चीत करण्यात आली असुन 38 व्यक्तींची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 907 व्यक्तींविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
2 लाख ठेवीदारांना 528 कोटीचे देणे
जिल्ह्यातील 5 लाख 97 हजार ठेवीदारांपैकी 3 लाख 63 हजार ठेवीदारांना 502 कोटींचे वाटप करण्यात आले आहे. आता 2 लाख 33 हजार ठेवीदारांना 528 कोटी रूपये देणे बाकी आहे. जिल्ह्यातील 37 पतसंस्थांवर प्रशासक तर आठ संस्थांवर अवसायक नियुक्त करण्यात आले आहे.