पुणे । पुणे महापालिकेच्या आजी माजी नगरसेवकांचा वैद्यकीय खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जातो. गेल्या पाच महिन्यांमध्ये नगरसेवकांच्या वैद्यकीय उपचारापोटी तब्बल 35 लाख रुपयांचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून झालेला आहे.
पुणे महापालिकेकडून माजी सदस्य व त्यांच्या पत्नी अथवा पतीस, तर विद्यमान सदस्य असल्यास त्या सदस्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च केला जातो. त्यासाठी महापालिकेच्या मुख्यसभेने 2014-15 मध्ये ठराव करून नगरसेवकांसाठी अंशदायी वैद्यकीय योजनेस मान्यता दिली होती.
60 नगरसेवकांनी घेतला लाभ
या योजनेनुसार, नगरसेवकांनी एखाद्या रुग्णालयामध्ये दाखल होत असताना महापालिकेल अगोदर कळवणे आवश्यक असते. यानंतर पालिका प्रशासन रुग्णालयाला पत्र देऊन बिलाची हमी घेते. काही वेळा उपचार पार पडल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकांच्या नावे बिले अदा करण्यात येतात. गेल्या पाच महिन्यांमध्ये तब्बल 60 नगरसेवकांनी या योजनेचा फायदा घेतला असून 28 नगरसेवकांनी उपचारानंतर बिले सादर केली आहेत. तर 32 नगरसेवकांची बिले रुग्णालयांच्या नावावर देण्यात आली आहेत. त्यासाठी आतापर्यंत 34 लाख 76 हजार रुपये खर्च झाले आहेत.