पुणे । डीजे लावण्यासंदर्भात प्रशासनाचे नियम स्पष्ट नसून शहराच्या विविध भागात वेगवेगळे नियम लावले जात आहेत. त्यामुळे डीजे चालकांना याचा नाहक त्रास होत आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी साउंड अॅन्ड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशन यांच्या वतीने उद्या (शुक्रवार) पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपास शहरातील सर्व साउंड, लाइट आणि जनरेटर मालकांनी तसेच मुंबईतील पाला या संघटनेनेदेखील पाठिंबा दर्शविला आहे.
साउंड, लाइट आणि जनरेटरचा व्यवसायावर चुकीच्या पद्धतीचे निर्बंध लादले जात असून शहरात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम लावले जातात. पोलीस आरोपींप्रमाणे डीजे चालकांना मारहाण करतात. डेसिबलची माहिती नसताना त्यांच्या मर्जीप्रमाणे कारवाई करतात. महागड्या वस्तूंवर काठ्या मारून सामानाचे नुकसान केले जाते. दोन साउंड लावण्याची परवानगी देण्यात आली असली तरी त्यामध्ये देखील एक बेस एक टॉप की दोन बेस दोन टॉप असा घोळ आहे. त्यामुळे मंडळ आणि पोलीस यांच्या वादामध्ये नुकसान साउंडवाल्यांचेच होत आहे.
20 ते 30 ढोल वाजवण्यास परवानगी मिळते
गणेशोत्सवात ढोलाला पारंपरिक वाद्य म्हणून परवानगी मिळते; परंतु त्याचा देखील आवाज मोठाच असतो. 20 ते 30 ढोल वाजवण्यासाठी पोलिसांची परवानगी मिळते. मात्र डीजेच्या चार बेस लावण्यालादेखील परवानगी नाकारली जाते, असे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे एक लाख साउंड व्यावसायिक आहेत. प्रत्येकाकडे किमान चार कामगार आहेत. म्हणजेच साउंडच्या व्यवसायावर सुमारे चार लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे.