सर्व पक्षांमध्ये बंडखोरीला उधाण

0

मुंबई। महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या लालबाग-परळमधील शिवसेनेचे नगरसेवक नाना आंबोले यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, शिवसेनेचा बालेकिल्ल्यात फूट पाडण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरली आहे. यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे भाजपमधील इच्छुकांची मोठी संख्या पाहता या पक्षातूनही विद्रोहाचे सुर उमटू लागली आहेत. भाजपच्या यादीत मंत्री, आमदार, खासदार यांच्या घरातच उमेदवारी दिल्याने भाजपच्या इच्छुकांमध्ये धुसफूस वाढली आहे. पक्षातील बंडखोरीचा धोका लक्षात घेऊन शिवसेना आणि भाजपने उमेदवारी यादीबाबत कमालीची गुप्तता राखली होती. शिवसेनेने बुधवारी रात्रीच ए बी फॉर्म वाटप केले. मात्र दोन्ही पक्षाच्या याद्या सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दोन्ही पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी न मिळालेले इच्छुकानी दुसर्‍या पक्षाची वाट धरण्यास सुरुवात केली आहे. तर काँग्रेसमधील दोन गट एकमेकांना भिडले.

भाजपमध्ये यादीवरून गोंधळ
भाजपमध्ये इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. या पार्श्‍वभूमिवर यादी केव्हा जाहीर होणार? याकडे लक्ष लागले होते. यातच शुक्रवारी अधिकृतरित्या यादी जाहीर होण्यापूर्वीच सोशल मीडियात यादी फुटल्याने पक्षात अस्वस्थता पसरली. या यादीतील घराणेशाहीमुळे इच्छुकांमध्ये नाराजी वाढली आहे. व्हायरल झालेल्या पहिल्या यादीत खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना वॉर्ड क्रमांक 108, आमदार राज पुरोहित यांचा मुलगा अवकाश पुरोहित यांना प्रभाग क्रमांक 221, राज्यमंत्री विद्या ठाकुर यांचा मुलगा दीपक ठाकूर यांना गोरेगावातील वॉर्ड क्रमांक 50 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांच्या पत्नी रुक्मिणी खरटमोल यांना प्रभाग क्रमांक 148 मधून उमेदवारी दिली आहे. तसेच भाजप प्रवक्ते अतुल शाह यांना प्रभाग क्रमांक 220 मधून तिकीट देण्यात आले आहे. तसेच या यादीत अनेक आयात उमेदवारांची नावे असल्याने इच्छुकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

शिवसेनेत बंडाळी
शिवसेनेच्या लालबाग-परळ या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत भारतीय जनता पार्टीने तेथील नगरसेवक नाना आबोले व त्यांच्या पत्नी तेजस्वीनी आंबोले यांना पक्षात प्रवेश दिला. त्याबरोबर शिवाजीनगर-मानखूर्द विभागातील नगरसेवक बबलू पांचाळ व त्यांच्या पत्नी अनिता पांचाळ आणि महापालिकेत सभागृह नेते म्हणून ज्यांनी कारकीर्द गाजवली असे मुलुंडमधील माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी गुरूवारी त्यांच्या समर्थकांसह मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. नाना आंबोले म्हणाले की, मी सर्वसामान्य माणसांसाठी वॉर्डमध्येच नाही तर त्यापलीकडे जाऊनही गेली अनेक वर्षे काम करतो आहे. मला राजकारणापेक्षा समाजसेवेचे काम करायला आवडते. मी जनतेचा सेवक आहे. भाजपा अशाच चांगल्या कामांना घेऊन जनतेची सेवा करते आहे म्हणून मी पक्षप्रवेश करत आहे. पांचाळ म्हणाले की, मी एक सामान्य कार्यकर्ता असून गेली पाच वर्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर माझ्या विभागातील लोकांसाठी काम करत राहिलो. मात्र, माझ्या विभागाचे खासदार यांना कार्यकर्त्यांपेक्षा आपले कुटूंबीय महत्त्वाचे वाटतात म्हणून मी माझ्या पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजपामध्ये प्रवेश करत आहे.

काँग्रेसमध्ये धुम्मस
मुंबई काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी होत असल्याचे आधीही दिसून आले आहे. आता महापालिका निवडणुकीनिमित्त हा कलह पुन्हा उफाळून आला आहे. आज मुंबईत सुरू असलेल्या काँग्रेसच्या बैठकीदरम्यान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी झालेल्या गोंधळात एक कार्यकर्ता जखमी झाला असून, दोन्ही गटातील वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. काँग्रेसला याचा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची
शक्यता आहे.