सिडनी: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय फिरकीपटूंपासून सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा ही फिरकी जोडी आमच्यासाठी खूप घातक आहे. या दोघांच्या गोलंदाजीविरोधात खेळताना एकच दृष्टीकोन कायम ठेवून चालणार नाही, असे मॅक्सवेल म्हणाला. ऑस्ट्रेलियाचा संघ येत्या २३ फेब्रुवारीपासून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाच्या आव्हानाला सामोरा जाणार आहे. भारतीय संघ मायभूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने या मालिकेसाठी तयारी देखील सुरु केली आहे.
ऑस्ट्रेलियाची जोरदार तयारी
मॅक्सवेल म्हणाला की, संघात सहाव्या स्थानी फलंदाजी करणे कठीण असते. तुमच्यासोबत नेहमीच चांगलाच फलंदाज असेल असे नाही. या स्थानावर खेळताना तुम्हाला खूप सावधगिरीने आणि परिस्थितीनुसार फलंदाजी करावी लागते. प्रत्येक वेळेस एकच दृष्टीकोन ठेवून खेळणे चुकीचे ठरते, हे मी याआधी भारतात खेळलेल्या सामन्यांतून अनुभवले आहे. भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान काबिज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
आखली चोख रणनीती
भारतीय फिरकीपटूंचे आव्हान फोडून काढण्यासाठी याआधीच ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापनाने इंग्लंडचा माजी गोलंदाज माँटी पानेसर याला प्रशिक्षक ताब्यात दाखल केले आहे. माँटी पानेसर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अश्विन आणि जडेजाच्या फिरकीला सामोरे जाण्याचा सल्ला देणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दुबईत सराव शिबीराला उपस्थित राहणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.