54 lakh embezzlement in Shelvad District : Former Sarpanch Nilesh Mali arrested by the police बोदवड : तालुक्यातील शेलवड ग्राम पंचायतीत 14 व्या आणि 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत वेळोवेळी अपहार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात हव्या असलेल्या माजी प्रभारी सरपंच निलेश माळी यास बोदवड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
भ्रष्टाचार प्रकरणी दाखल होता गुन्हा
बोदवड तालुक्यातील शेलवड, मुक्तळ, विचवा, सुरवाडे बु.॥ ग्राम पंचायतीमध्ये 30 डिसेंबर 2018 ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब उघड झाली होती. याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) रमेश भास्कर सपकाळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादनुसार या ग्रामपंचायतीतचे तत्कालीन ग्रामसेवक संदीप चंद्रभान निकम आणि शेलवड ग्रामपंचायतचे तत्कालीन प्रभारी सरपंच निलेश शांताराम माळी यांच्या विरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीतांनी तब्बल 52 लाख 94 हजार 180 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याने हा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे अधिक तपासासाठी वर्ग करण्यात आला होता.
गोपनीय माहितीवरून कारवाई
या गुन्ह्यात पसार आरोपी तथा माजी प्रभारी सरपंच निलेश माळी हे रात्रीच्या वेळी घरी येत असल्याची माहिती बोदवड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पाळत ठेवून सोमवार, 12 सप्टेंबर रोजी मध्यरात्री माळी यास अटक केली. पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव, पोलिस नाईक संदीप झरवाल, भगवान पाटील, निलेश शिसोदे, मुकेश पाटील, दीपक पाटील, रुपाली डांगे तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक महेश घायतड, एएसआय जगताप, एएसआय पठाण, नितीन सपकाळ यांनी आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.