‘गाय मानवासाठी आवश्यक शक्ती’

0

पुणे । गायीशिवाय घर नाही आणि घराशिवाय गाय नाही, अशी परिस्थिती पूर्वी भारतात होती. परंतु आता गायीची कत्तल केली जात आहे. प्रत्यक्षात गाय हे केवळ जनावर नाही, तर माणसासाठी चालते फिरते रुग्णालय आहे. गायीपासून मिळणारे शेण, मूत्र, शिंग, दूध, तूप या प्रत्येक गोष्टीमध्ये औषधी गुण आहेत. गाय ही मानवी शरीरासाठी आवश्यक शक्ती असून त्यामुळे गायी वाढवा अभियान राबवायला हवे, असे विचार आचार्य प.पू.साध्वी प्रीती सुधाजी यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्संग कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश कला क्रीडा मंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गायीचे महत्त्व, गणपतीचे महात्म्य आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व याविषयी महत्त्व कथन केले. दगडूशेठ ट्रस्टतर्फे गोशाळा आणि गोरक्षणाकरीता 51 हजार रुपयांचा निधी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

प.पू.साध्वी प्रीती सुधाजी म्हणाल्या, सध्या शेतातील मातीलाही शेण मिळनासे झाले आहे. त्यामुळे मातीला खरी शक्ती मिळत नाही. रासायनिक प्रक्रियांमुळे शेतीतील मातीसह हवा, पाणी, फळं, फुलं हे विषारी होत चालले आहेत. यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये कोणाची ना कोणाची तब्येत बिघडते. घरामध्ये औषध नाही, असे घर शोधून सापडणार नाही. आपला देश स्वस्थ आणि निरोगी होता. परंतु विदेशी लोकांनी यामागील गायीचे महत्त्व जाणून गैरफायदा घेतला आहे. त्या म्हणाल्या, देशी आणि विदेशी गाय-बैलांमधील फरक आपण प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे. देशी गाय आणि बैल यांची ओळख झाली तरच गायी जगविणे शक्य आहे. गायीचे कायदे आणि फायदे देखील सामान्य माणसापर्यंत पोहोचायला हवे. गायींच्या रक्षणासोबतच आपण प्रत्येकाने शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करायला हवा. आम्ही जिथे जातो, तेथे गायींचे माहेरघर साकारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण सर्वांनी गोशाळांना मदत करण्यासोबतच गोरक्षणाकरीता पुढे येण्याची गरज आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे शक्ती केंद्र आहे.