शहरातील सागर पार्कची ४ एकर जागा महानगरपालिकेचीच

0

जळगाव । सागरपार्कची जागा आरक्षित करण्यावरून महापलिका व मुळ मालकांमध्ये कायदेशीर वाद सुरु होता. शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने मुळ मालक असलेल्या लुंकड परिवाराची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे ही जागा महापलिकेची असल्यावर शिक्कामोर्तब झाले. ४ एकर क्षेत्रफळ असलेल्या या जागेचे मुल्य सुमारे १०० कोटी रुपयांपर्यत असल्याने या निर्णयामुळे महापलिकेला मोठा दिलासा मिळाल्याची माहीती महापौर नितिन लढ्ढा यांनी दिली.

दिलेल्या वेळेत भूसंपदान न केल्याने याचिका
सागरपार्कच्या जागेसाठी लुंकड परिवाराने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. न्या.मदन लोकुर, न्या.प्रफुल्ल सी. पंत यांच्या द्वीपीठाने आज आपल्या निकालात लुंकड परिवाराची याचिका फेटाळून लावली. सागरपार्कची जागा नथमल सागरमल लुंकड यांची होती.विकास आराखड्यात या जागेवर वाचनालय, सुतिकागृह, बगीचा असे आरक्षण निघाले. १९८६ मध्ये लुंकड परिवाराने तत्कालीन जळगाव पालिकेला भूसंपादनासाठी कलम १२७ प्रमाणे नोटीस दिली होती. दिलेल्या मुदतीत जागेचे भूसंपादन केले नाही. त्यामुळे जागा ताब्यात मिळण्यासाठी लुंकड परिवारांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. मात्र नगरविकास योजनेनुसार ही जागा पुन्हा पालिकेकडे वर्ग झाली. त्यावेळी पालिकेने जागेचा मोबदला दिल्याचा दावाही केला होता. त्यावेळीही हायकोर्टाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला.

आरक्षणाच्या प्रयोजना व्यतिरिक्त वापर होत असल्याचा आरोप
सन २००२ मध्ये माजी आ.सुरेशदादा जैन यांनी या जागेवर ४१ मजली इमारत बांधकाम करण्याची घोषणा केली होती. जागेवर असलेल्या आरक्षणाच्या प्रयोजना व्यतिरिक्त वापर होत असल्याचा आरोप करीत जागा ताब्यात द्यावी, अशी याचिका लुंकड परिवाराने दाखल केली होती. यावर कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे पालिकेने इमारत बांधण्याची प्रकीया रद्द केली. त्यानंतर पुन्हा लुंकड परिवाराने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर १५ दिवसांपूर्वी न्या.मदन लोकुर, न्या.प्रफुल्ल सी. पंत यांच्या न्यायपीठासमोर कामकाज झाले. दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद झाला. कोर्टाने शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी लुकंड परिवाराची याचिका फेटाळून लावली. मनपातर्फे अ‍ॅड. शिवाजी जाधव, अ‍ॅड.हिरेन रावल तर लुंकड परिवारातर्फे अ‍ॅड.मनोहर नाफडे, अ‍ॅड.अभय मनोहर, अ‍ॅड.चेला स्वामी यांनी काम पाहिले.