जिल्हा बार असोसिएशनचा सोमवारी बंद

0

पुणे । शिवाजीनगर न्यायालय परिसरात ज्येष्ठ वकिलाला माजी नगरसेवकाने मारहाण केल्याप्रकरणी पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी (दि.14) बंद पुकारला आहे. वकिलांनी कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहन पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर आणि उपाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी केले आहे.

ज्येष्ठ वकील राजेंद्र विटणकर यांनी एका दिवाणी दाव्यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास गायकवाड याची उलट तपासणी घेतली. त्यानंतर गायकवाड यांनी अ‍ॅड. विटणकर यांना बुधवारी (दि.9) रोजी मारहाण केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप गायकवाड याला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे पुणे बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे. यासंबंधी झालेल्या निर्णयावेळी पुणे जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. संतोष जाधव, सचिव अ‍ॅड. विवेक भरगुडे, अ‍ॅड. आशिष ताम्हाणे, अ‍ॅड. कुमार पायगुडे, खजिनदार अ‍ॅड. दत्ता गायकवाड यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…तर होणार कडक कारवाई
कैलास गायकवाड याचे वकील पत्र कोणी स्वीकारल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे बार असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बंदला धर्मादाय आयुक्तालय येथील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनने पाठिंबा दिला आहे.