‘सोनू तुला व्यायामावर भरवसा…’ गमतीदारपद्धतीने जनजागृती अभियान

0

वारजे । ‘सशक्त भारत’ या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करताना व्यायामाचे महत्त्व सांगत, ‘सोनू तुला व्यायामावर भरवसा नाय काय’, अशा गमतीदारपद्धतीने नागरिकांचे लक्ष वेधत तरुणांनी जनजागृती अभियान राबविले. ‘वाहतुकीचे नियम पाळा, सुजाण नागरिक व्हा शरीराचे नियम पाळा, सशक्त नागरिक व्हा, क्लिन इंडिया, ग्रीन इंडिया, फिट इंडिया, गणपती बाप्पा मोरया, करू या श्रीगणेशा व्यायामाचा’ अशा घोषणा देत हातात फलक घेऊन युवक-युवतींनी व्यायाम आणि संतुलित आहाराविषयी जनजागृती केली. वारजे येथील व्ही.एल.के. फिटनेस क्लबतर्फे व्यायाम आणि योग्य आहाराविषयी जनजागृती करण्याकरीता अभियान राबविण्यात येत आहे. याची सुरुवात वारजे उड्डाणपुलाखाली जनजागृतीपर उपक्रमाने झाली. यावेळी फिटनेसतज्ज्ञ निखिल अष्टेवाले, मकरंद कलबुर्गी, बाळकृष्ण निढाळकर, संजीवनी जाधव, विनय कुराडे उपस्थित होते. अष्टेवाले म्हणाले, सध्या व्यसनाधीनतेकडे तरुणवर्ग वळत आहे. त्यांना यापासून दूर ठेवण्याकरीता व्यायाम हा सर्वोत्तम उपाय आहे. व्यायाम हेच व्यसन असून संतुलित आहाराकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला हवे.

निढाळकर म्हणाले, शारीरिक अडचणींसंदर्भात डॉक्टरांकडे एक तास घालविण्याऐवजी दररोज एक तास व्यायाम करणे जास्त सोपे आहे. मधुमेह वा इतर आजारांमुळे बहुतांश नागरिक त्रस्त आहे. त्यांच्याकरीता व्यायाम हा उत्तम उपाय आहे. जी व्यक्ती श्वास घेऊ शकते, ती व्यक्ती सहज योगाही करू शकते. परंतु त्याकरीता गरज आहे फक्त व्यायाम करण्याची. उत्तम आरोग्याकरीता सक्षम साथीदार असणार्‍या अनेक तालमी, जिम आणि मैदाने आहेत. आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून व्यायाम करीत निरोगी राहण्याकरीता प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत.