हडपसर । दिवसेंदिवस महाविद्यालयात वर्गात तासाला उपस्थित राहणार्या विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे. हे चिंताजनक आहे. प्राध्यापकांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. पूर्वी व्यासंगी प्राध्यापकांच्या तासांना त्या विषयाचेच नव्हे तर अन्य विषयांचेही विद्यार्थी उपस्थित राहत असत. एवढा प्राध्यापकांच्या विद्वत्तेचा दरारा होता. आज तो का कमी झाला आहे? याचे चिंतन केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ डॉ. प्रा. चिं. शेजवलकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणार (कै.) डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध समीक्षक डॉ. ल. रा. नसिराबादकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. विलास खोले, नसिराबादकर यांच्या कन्या सुनीता लेंगडे, प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, पराग जोगळेकर, उज्ज्वला जोगळेकर उपस्थित होते. शेजवलकर म्हणाले, डॉ. गं. ना. जोगळेकर यांनी परिषदेला नावारूपाला आणले. ते ज्ञानसंपन्न प्राध्यापकांच्या पिढीचे प्रतिनिधी होते.
प्रा. जोशी म्हणाले, डॉ. जोगळेकर हे साहित्य संस्थांचा आधारवड होते. निरपेक्ष आणि निरलस वृत्तीने संस्थात्मक कार्य कसे पुढे नेता येते याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी परिषदेच्या कार्यातून निर्माण केला. यावेळी उज्ज्वला जोगळेकर, सुनीता लेंगडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.