…56 इंचाची छाती असणारे सरकार आता गप्प का?

0

मुंबई : नोटाबंदी केल्यानंतर दहशतवादी हल्ले होणार नाहीत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. पण, नोटाबंदीनंतरही हल्ले सुरूच आहेत. भारतीय जवानांच्या मृतदेहांचे विटंबना करण्यापर्यंत पाकिस्तानी सैन्याची मजल गेली असून 56 इंचाच्या छातीवाले केंद्र सरकार आता गप्प का आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

पाकिस्तानने भारताच्या दोन सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना करण्याच्या हिडीस प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हिंसाचाराच्या घटनाही वाढतच आहेत. भारतीय जनता पार्टीचे काश्मीर धोरण सपशेल अपयशी ठरले असून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे काश्मीर अशांत झाले आहे, असे ते म्हणाले.

पाकिस्तानी सैन्य वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करत आहे. पाकिस्तानने दोन भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना केली आहे. पाकिस्तानने एका भारतीय सैनिकाला मारले तर पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा शिरच्छेद करण्याच्या वल्गना करणारे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करणारे नरेंद्र मोदी आता पंतप्रधान आहेत व सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री आहेत. तरीही पाकिस्तानच्या कुरापती का कमी झाल्या नाहीत? त्यांच्याविरध्द ठोस कारवाई का केली जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या हलाखीसाठी शिवसेनाही जबाबदार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना भेटण्याची नाटके बंद करावीत. शिवसेना सत्तेत आहे. त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अन्यथा सत्तेतून बाहेर पडावे. शिवसेनेने राज्यातल्या जनतेला गृहीत धरू नये. राज्यातील जनता सूज्ञ असून ती योग्य वेळी शिवसेनेला धडा शिकवेल. भाजपा इतकेच शिवसेनेचे मंत्रीही सत्तेचा उपभोग घेत आहेत. त्यामुळे कर्जमाफीअभावी झालेल्या शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीला तेही तितकेच जबाबदार आहेत, असे चव्हाण म्हणाले.

तूर घोटाळा सिद्ध
मी गेल्याच आठवड्यात सांगितले होते की तूर खरेदीत मोठा घोटाळा आहे. आता ते सिध्द झाले आहे. तूर खरेदीत 400 कोटींचा घोटाळा झाल्याचे आता उघड झाले आहे. सरकारने घोटाळेबाजांवर तत्काळ कारवाई करावी. यात काही सरकारी अधिकारी गुंतले असण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यावरून फडणवीस सरकारचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.