पुणे । डेव्हिस चषकात दुहेरीतील 42 विजय साधलेल्या पेसला विश्वविक्रमासाठी शनिवारी झालेल्या सामन्यात विजय आवश्यक होता. मात्र अडीच तासांपेक्षा जास्त चालेली ही लढत 3-6, 6-3, 7-6 (8-6), 6-3 ने जिंकून आर्टम सिटाक आणि मायकेल व्हिनस जोडीने भारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेस आणि विष्णूवर्धन ही जोडी अतिशय अटीतटीच्या लढतीत पराभूत केले. डेव्हिस चषकाच्या इतिहासात सर्वाधिक दुहेरी लढती जिंकण्याचा पेसचा विश्वविक्रम हुकला. पेससह भारतीय टेनिसप्रेमींचा अपेक्षाभंग झाला. म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील टेनिस स्टेडियमवर उभय संघांमधील आशिया-ओशनिया यांच्यात लढत सुरू आहे.
अस्तित्वाच्या लढाईत न्यूझीलंडची सरशी
कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेला 43 वर्षीय पेस ही लढत जिंकून विश्वविक्रम रचण्यासाठी उत्सुक होता. दुसरीकडे, पहिल्या दिवशीच्या दोन्ही लढती गमावल्यामुळे 0-2ने माघारलेल्या पाहुण्या न्यूझीलंड संघाला आपले आव्हान जीवंत ठेवण्यासाठी दुहेरीचा सामना जिंकणे आवश्यक होते. या संघर्षात अखेर अस्तित्वासाठी झुंज देणार्या न्यूझीलंडच्या संघाने सरशी साधली. या लढतीत यजमान भारत सध्या 2-1ने आघाडीवर असून रविवारी 5 परतीच्या एकेरीच्या लढती होतील. ही लढत जिंकण्यासाठी रविवारच्या दोनपैकी एका लढतीत भारताला विजय आवश्यक आहे. तब्बल पहिला सेट अवघ्या 28 मिनिटांत 6-3 असा जिंकत भारतीय जोडीने आश्वासक प्रारंभ केला. जवळपास 2 मिनिटांत भारतीय जोडीने पहिला गेम झटपट जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या जोडीनेही आपली सर्व्हिस राखत 1-1 अशी बरोबरी साधली. 2-2 अशा स्कोअरनंतर भारतीय जोडीने खेळावर पकड घेत 5-2ने आघाडी साधली. दुसरीकडे पेसचा नेटजवळील चपळ अन् वेगवान खेळ बघता हा तो 43 वर्षांचा आहे, यावर विश्वास बसत नव्हता. आठवा गेम न्यूझीलंड जोडीने झटपट जिंकत आपण सहजासहजी नमते घेणार नसल्याचे संकेत दिले. अखेर विष्णूने वेगवान एस सर्व्हिस करीत पहिला सेट 6-3ने भारताच्या नावे केला. दुसर्या सेटच्या प्रारंभी दोन्ही जोडींनी आपापली सर्व्हिस राखली.