महाड । मुंबई गोवा महामार्गाचर महाड शहरालगत असलेल्या पी.जी. सिटी संकुलातील गोविंद सागर इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये आज एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. नितीन अविनाश कुलकर्णी (वय 50 मूळ रा. सांगली ) असे मृत व्यक्तिचे नाव असुन ते शिवकृपा मोटर्समध्ये ते सुपरवायझर म्हणून नोकरीला होते. गोविंद सागर इमारतीमधील फ्लॅट नं. चारमध्ये कुलकर्णी आपल्या एका सहकार्यासह रहात होते. गुरूवारी 17 ऑगस्टला सायंकाळी त्यांचा सहकारी जेवण आणण्यासाठी बाहेर गेला.
अकस्मात मृत्यूची नोंद
तो परतल्यानंतर वारंवार बेल वाजवून त्याचप्रमाणे मोबाईलवर संपर्क साधूनहि नितीन कुलकर्णी यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कंटाळून हा सहकारी आपल्या मित्राकडे झोपायला गेला. सकाळी त्यांच्या सहकार्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला अखेर शेजारी आणि पोलिसांच्या मदतीने दरवाजा फोडण्यात आला त्यावेळी नितीन कुलकर्णी हे मृतावस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यु झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.