कल्याण । घरी अभ्यास करत बसलेल्या 14 वर्षीय मुलीचे केस कापल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद कोळशेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अश्या प्रकारे केस कापण्याची ही कल्याणमधील दुसरी घटना आहे. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कल्याणमधील न्यू गोविंदवाडी परिसरात 14 वर्षीय मुलगी घरी अभ्यास करत बसली होती. तेव्हा ती अचानक बेशुद्ध पडली. ती बेशुद्ध पडल्याने तिच्या भावाचे तिच्याकडे लक्ष्य गेले. त्यावेळी तिचे केस कापण्यात आले होते. कापलेले केस तिच्या शेजारीच पडलेले होते. त्याने तिच्या तोंडावर पाणी मारुन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कल्याणसह आजूबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा
यापूर्वी डोंबिवलीतील पिसवली व कल्याण मलंग रोडवर केस कापण्याचे दोन घटना घडलेल्या आहे. केस कापण्याच्या घटनांचे सत्र कल्याणमध्ये सुरुच आहे. या घटनेमुळे तिच्या घरच्यांमध्ये व शेजारी राहणार्या महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेप्रकरणी तिच्या पालकांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्याची माहिती दिली आहे.
गूढ कायमच
महाराष्ट्रात विविध भागात चोटी म्हणजे केसाची वेणी कापणारी गँग धुमाकूळ घालत आहे. तिचे लोण आता कल्याणमध्ये पसरलेय की काय, अशी भीती सगळ्यांना वाटत आहे. यानिमित्ताने अनेक अफवा देखील पसरवल्या जात आहेत. चोटी गँग कधीही येते आणि मुलींचे केस कापते, याबद्दल गूढ अजूनही कायम आहे. घराच्या दारावर लिंबू, कडू लिंबाचा पाला बांधला, मुलींच्या महिलांच्या पायाला लाल कलर लावला तर ही गँग येत नाही, अशा एक ना अनेक अफवांचे पेव फुटले आहे.
पोलिसांचे आवाहन
चोटी गँगच्या दहशतीने लहान, मोठ्या मुली दहशतखाली वावरत आहेत. चोटी गँगपासून वाचण्यासाठी काही जणी तर डोक्याला चक्क कपडा बांधूनच घराबाहेर पडत आहेत. हे चोटी गँगचं गूढ कधी उकलणार, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.शहरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या मागे नक्की कोण आहे, अथवा या घटना कशा होतात याचा छडा लावणे गरजेचे आहे. वाढत्या घटना लक्षात घेता याबाबत पोलीस यंत्रणेने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले आहे.