हवेली । सार्वजनिक गणेशोत्सव व बकरी ईदच्या दरम्यान आयोजित कार्यक्रमात मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार असल्याचा इशारा हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड यांनी दिला. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत कदमवस्ती येथील मधुबन मंगल कार्यालयाच्या ठिकाणी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, युगंधर काळभोर, मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश काळभोर, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, ’यशवंत’चे माजी संचालक रघुनाथ चौधरी, पुणे बार असोसिअशनचे राहुल झेंडे, सुभाष काळभोर, पोलिस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलिस मित्र संघटनेचे पदाधिकारी, महिला, विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ध्वनीप्रदूषण दक्षता समितीच्या सदस्यपदावर माझी नियुक्ती झाली आहे. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव व बकरी ईदच्या कालावधीमध्ये ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच उत्सव काळामध्ये वर्गणीसाठी जबरदस्ती करणार्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. सार्वजनिक उत्सवांचा वापर समाजहितासाठी करून महिलांनाही त्यामध्ये सहभागी करून घ्या. गणपती विसर्जन मिरवणूक डीजे व गुलाल विरहीत व्हावी यासाठी सर्व मंडळानी प्रयत्न करावेत, असे गरुड यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले.