57 गावांच्या सुरक्षेचा अवघ्या 31 पोलिसांवर भार

0

रावेर तालुक्यात 11 गावे संवेदनशील ; ब्रिटीश काळापासून 52 कर्मचारी संख्या मंजूर ; जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दखल घेण्याची अपेक्षा

रावेर- अप्रिय घटनांमुळे संवेदनशील तालुका अशी ओळख असलेल्या रावेर तालुक्या तालुक्यात 57 गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या जवाबदारी अवघ्या पोलिसांवर आहे. परीणाम कायदा-सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यात रावेर पोलिसांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. हिंदु-मुस्लिम बांधवांचे सण-उत्सव तोंडावर असतांना पोलिसांचे अपूर्ण संख्याबळ रावेर शहर तालुक्याच्या शांततेसाठी चिंताजनक आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याबाबत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

ब्रिटीशकाळापासून कर्मचारी ‘जैसे थे’
पोलिस स्टेशन अंतर्गत रावेर शहरासह 11 गावे अती संवेदनशीलमध्ये येतातफ या सर्व गावांना शुल्लक कारणामुळे दंगली तसेच जातीय तणावातून गुन्हे घडले आहेत. त्यात 20 पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्याने पोलिसांचे संख्याबळ अपूर्ण पडत आहे. ब्रिटीश काळापासून लोकसंख्येनुसार रावेर पोलिस स्टेशनला 52 कर्मचार्‍यांची संख्या मंजूर आहे ही संख्या आजही कायम आहे.

अशी आहेत अती संवेदनशील गावे
पोलिस स्टेशनच्या हद्दीत शहरासह, रसलपूर ,रमजीपूर, कुसुंबा, अहिरवाडी, मोरगांव, खिरवड, उटखेडा, बक्षीपूर, पाल, रसलपूर, आभोडा ही गावे अतिसंवेदनशील प्रकारात येतात. शिवाय लागूनच मध्यप्रदेश राज्याची सीमा रावेर पोलिस स्टेशना लागून असल्याने गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी येथील पोलिसांचे संख्याबळ वाढविण्याची गरज आहे.

अवघ्या 31 कर्मचार्‍यांवर मदार
रावेर पोलिस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था आजघडीला अबाधीत असलीतरी अप्रिय घटना केव्हा व कुठे घडेल? हे सांगता येत नाही. पोलिस स्टेशनला सद्या एक पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक तर 46 पोलिस कर्मचारी कार्यरत होते मात्र नुकत्याच 20 कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्याने तसेच पाच कर्मचारी बदलून आल्याने ही संख्या फक्त 31 कर्मचारी इतकी आहे. त्यातच दैनंदीन सुट्या, साप्ताहिक रजा, आजारपण तसेच गुन्ह्यांचा तपास आदी कामे व्यस्त असलेल्या पोलिसांमुळे ग्रामीण भागातील गस्त घालण्यासह गुन्हेगारी रोखण्याचेही आव्हान आहे.